हा यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र नाही
By Admin | Updated: March 13, 2017 02:22 IST2017-03-13T02:21:42+5:302017-03-13T02:22:43+5:30
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हे शब्द म्हणजे यशवंतरावांचे यथार्थ वर्णन आहे. एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत,

हा यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र नाही
मधुकर भावे : यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान
नागपूर : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हे शब्द म्हणजे यशवंतरावांचे यथार्थ वर्णन आहे. एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी, मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नंच होते. समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी अखंडपणे केले. परंतु आज जो महाराष्ट्र आम्ही पाहतोय तो यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र नक्कीच नाही, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत मधुकर भावे यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त रविवारी धनवटे सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वि.स. जोग, विशेष अतिथी डॉ. सतीश चतुर्वेदी आणि डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते. आजच्या प्रगत महाराष्ट्रात यशवंतरावांची कशी उपेक्षा होतेय हे सांगताना भावे म्हणाले, या नेत्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी पूर्ण राज्यात केवळ दोनच कार्यक्रम झाले. एक त्यांच्या समाधीस्थळी कराडला आणि दुसरा नागपुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात.
आपल्या राज्यातील जायकवाडीसारखे मोठे धरण असेल वा कोराडीचा ऊर्जा प्रकल्प असेल. असे मोठे प्रकल्प १९८० नंतर कुणी उभारू शकले नाही. आज राजकारणात सात्विकता उरली नाही. नुसता स्वार्थाचा बाजार आहे. यशवंतरावांवर भूमिका बदलल्याची टीका होत असेल पण त्यांनी कधीच राष्ट्रहिताशी तडजोड केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
या कार्यक्रमाला डॉ. प्रमोद मुनघाटे, अजय पाटील, डॉ.कोमल ठाकरे, प्रेम लुनावत, रमेश बोरकुटे, मोहम्मद सलीम हेही उपस्थित होते.(प्रतिनिधी)