हा व्यक्तींचा नव्हे, कर्तृत्वाचा सत्कार

By Admin | Updated: December 25, 2016 03:09 IST2016-12-25T03:09:59+5:302016-12-25T03:09:59+5:30

सुमतीताई सुकळीकर हे सर्व प्रकारच्या भेदाभेदांपलिकडील व्यक्तिमत्त्व होते.

This is not the person's fame, the fame | हा व्यक्तींचा नव्हे, कर्तृत्वाचा सत्कार

हा व्यक्तींचा नव्हे, कर्तृत्वाचा सत्कार

गिरीश व्यास : लोकमाता पुरस्कार वितरण सोहळा
नागपूर : सुमतीताई सुकळीकर हे सर्व प्रकारच्या भेदाभेदांपलिकडील व्यक्तिमत्त्व होते. मोठ्या पदावर असताना दुसऱ्यांच्या वेदना, दु:ख, अडचणी समजून त्यांना मदतीचा हात देण्याची शिकवण तार्इंनी दिली. त्यामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार प्रतिष्ठेचा आहे. हा व्यक्तींचा नव्हे तर कर्तृत्त्वाचा सत्कार आहे, असे प्रतिपादन आमदार गिरीश व्यास यांनी येथे केले.
लोकमाता सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने सहावा वार्षिक पुरस्कार सोहळा शनिवारी एलएडी कॉलेजच्या नियोगी सभागृहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, डॉ. सुधीर कुन्नावार, सचिव ज्योत्स्ना पंडित, देवदत्त दस्तुरे, डॉ. प्रवीण गादेवार व सत्कारमूर्ती निर्माती आणि दिग्दर्शिका डॉ. समृद्धी पोरे, डॉ. विरल कामदार, व अशोक मुन्ने उपस्थित होते.
आ. व्यास म्हणाले, ताईंच्या नावाने हा सेवा आणि शौर्य पुरस्कार देताना समाधान वाटते. परंतु एक खंत अशीही वाटते, की काही दिवसांपूर्वी आयोजित एका मनोरंजनात्मक कार्यक्रमाला यशवंत स्टेडियममध्ये बसायला जागा नव्हती आणि आज जेव्हा देशसेवा करणाऱ्यांचा, त्यांच्या कार्याचा, शौर्याचा सन्मान केला जातो, त्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या आहेत. ही नागपूरकरांसाठी दुर्भाग्याची बाब आहे.
कार्यक्रमात निर्माती आणि दिग्दर्शिका डॉ. समृद्धी पोरे यांचा सन्मान अतिथींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांना लोकमाता पुरस्काराने गौरविण्यात आले. आपल्या अपंगत्वावर मात करीत एव्हरेस्ट शिखर गाठण्याची हिंमत करणाऱ्या अशोक मुन्ने यांना लोकमाता शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. गरीब, गरजुंच्या आरोग्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, रिसर्च अ‍ॅण्ड ह्युमन रिसोर्सेस या संस्थेला लोकमाता सामाजिक संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार या संस्थेचे डॉ. विरल कामदार यांनी स्वीकारला. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या तिन्ही पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. पोरे म्हणाल्या, प्रत्येक पुरस्काराने जबाबदारी वाढते. आपल्या माणसांनी केलेले कौतुक मनाला भिडते. समाजाचे ऋण फेडण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणा देत राहील. प्रास्ताविक डॉ. बोधनकर यांनी केले. संचालन वृशाली देशपांडे यांनी तर आभार डॉ. प्रवीण गादेवार यांनी मानले. डॉ. रवी वानखेडे यांनी अवयव दानाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)

Web Title: This is not the person's fame, the fame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.