नववर्षाचा उत्सव नाही, यंदा युवक करताहेत संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:02+5:302021-01-02T04:08:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दरवर्षी डिसेंबर महिना उजाडताच नववर्षाच्या स्वागताची तयारी युवकांमध्ये सुरू होते. आपापल्या सुविधेनुसार या तयारीला ...

नववर्षाचा उत्सव नाही, यंदा युवक करताहेत संकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरवर्षी डिसेंबर महिना उजाडताच नववर्षाच्या स्वागताची तयारी युवकांमध्ये सुरू होते. आपापल्या सुविधेनुसार या तयारीला मूर्त रूप येते, मात्र यंदा चित्र वेगळे आहे. कोरोनामुळे सार्वजनिक आयोजनावर सरकारने बंदी घातली आहे. कोरोनाची पडछाया नववर्षाच्या स्वागतावरही पडलेली दिसत आहे. त्यामुळे शहरातील युवकांनी उत्सव न करता नववर्षाला नवे संकल्प करण्याचा निश्चय केला आहे.
नेहा ठाकूर दरवर्षी नवनवीन उपक्रमातून नववर्षाचे स्वागत करते. मात्र यंदा तिने वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्यासोबत दिवस घालविण्याचा व त्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा बेत आखला आहे. वैष्णवी वानखेडे मागच्या वर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी रेस्टाॅरंटला गेली होती. यंदा घरी राहून कुटुंबीयांसोबत चित्रपट पाहण्याचे ठरविले आहे. शैलवी स्वामी आपल्या घराच्या घतावर नववर्षाच्या स्वागताची तयारी करण्यात गुंतली आहे. दिवे आणि लायटिंगने तिने छत सजविले आहे.
अनिरुद्ध मिश्रा दरवर्षी नववर्षाला मित्रांसोबत बाहेर असतो. मात्र यंदा त्याने आपल्याच घरी मित्रांना पाचारण करून नववर्षाच्या स्वागताची आखणी केली आहे. अनिकेत फडकडे म्हणाले, यंदा बाहेर जाणार नाही. सोशल मीडियावर सक्रिय राहून सर्वांसोबत संपर्क साधणार आहे. मयूर पाटील या युवकाने मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याचा आणि शांती अनुभवण्याचा निश्चय केला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी गृहिणीदेखील बऱ्याच उत्साहित असल्याचे जाणवले. वर्षा शर्मा म्हणाल्या, आपला संयुक्त परिवार आहे. कुटुंबात १६ सदस्य आहेत. सर्वजण दरवर्षी आपल्या परीने नववर्ष साजरे करतात. यंदा मात्र सर्वजण घरी राहणार असल्याने त्यांच्यासाठी मिठाई आणि पक्वान्न त्या बनविणार आहेत. सुनीता शर्मा म्हणाल्या, आपण नोकरी करून घर सांभाळतो. कोणताही सण असला की कुटुंबासोबतच तो साजता करतो. यंदा मुलांसाठी घरीच केक तयार करून नववर्षाच्या स्वागताची योजना आहे.