केवळ घोषणा नको, संघटनबांधणीत ध्येय आणि उद्दिष्ट हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST2021-02-05T04:52:52+5:302021-02-05T04:52:52+5:30

नागपूर : संघटनात्मक कार्य करताना केवळ घोषणा देऊन चालत नाही; तर ध्येय, उद्दिष्ट, अंमलबजावणी आणि यशस्विता हवी, असे प्रतिपादन ...

Not just declarations, but organization goals and objectives | केवळ घोषणा नको, संघटनबांधणीत ध्येय आणि उद्दिष्ट हवे

केवळ घोषणा नको, संघटनबांधणीत ध्येय आणि उद्दिष्ट हवे

नागपूर : संघटनात्मक कार्य करताना केवळ घोषणा देऊन चालत नाही; तर ध्येय, उद्दिष्ट, अंमलबजावणी आणि यशस्विता हवी, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंडरे यांनी केले. गुरुदेव सेवाभवनात रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार, राष्ट्रीय महिला प्रतिनिधी कविता भोसले, जिल्हाध्यक्ष सतीश साळुंखे, महानगर अध्यक्ष दिलीप धंदरे, माजी कार्याध्यक्ष जयसिंग चव्हाण उपस्थित होते. मेळाव्यात राजेंद्र कोंगरे म्हणाले, कार्यकर्त्यांनी संघटनेचे काम करताना ध्येयधोरणे समजून घ्यावीत. संघटनेचा लाभ समाजाला अधिक मिळावा यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. कार्यकर्त्यांचा सूर लक्षात घेऊन ते म्हणाले, सभेला येणे म्हणजे समाजाचे काम करणे नव्हे; तर विचारांवर विश्वास ठेवून काम करणे महत्त्वाचे असते. आजच्या काळात जात, धर्म, पंथाला महत्त्व नाही. गुणवत्ता महत्त्वाची आहे. त्याचा विकास करावा लागेल. काळासोबत चाललो नाही तर मागे पडण्याचा धोका असतो, असा इशारा त्यांनी दिला.

संघटना किती जुनी हे महत्त्वाचे नसून किती कृतिशिल आहे, हे महत्त्वाचे असते. तलवारीच्या टोकावर जमीन जिंकलेल्या आपल्याला आज आरक्षण मागण्याची वेळ आली आहे. पूर्वजांनी लढून जिंकलेल्या जमिनी आपणच ५० रुपयांत विकल्या, त्यामुळे काल कुठे होतो, आज कुठे आहोत व उद्या कुठे असू याचा विचार समाजाने करावा. मराठा मोर्चातून जगाच्या पाठीवर झेंडा रोवण्याची संधी होती. मात्र आपणच झेंड्याचे बांबू कापले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. संपर्क अभियानाची तयारी करा, तालुके व गावपातळीवरील संघटनात्मक बांधणीचे उद्दिष्ट १० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा, महिलांसाठी बनविलेल्या ॲपचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले.

विनायक पवार यांनीही संघटनात्मक बांधणीबद्दल मार्गदर्शन केले. तालुका, महानगर स्तरावर समिती स्थापन करा, प्रत्येक विधानसभा मतदार संघात समन्वयकाच्या नियुक्त्या करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अन्य पाहुण्यांचीही भाषणे झाली. विजय काळे यांनी अहवाल वाचन आणि संचालन केले. कविता भोसले यांनी प्रास्ताविक केले, तर गजानन काळे यांनी आभार मानले.

Web Title: Not just declarations, but organization goals and objectives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.