निवडणूक लढण्याचा अधिकार नाही, तर मतदानही करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:46 IST2021-01-02T00:45:19+5:302021-01-02T00:46:44+5:30
Gowari warnned, nagpur news निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी शेकडो उमेदवारांचा अर्ज रद्द करून त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले. त्यामुळे गोंडगोवारी समाजाने निवडणूक लढण्याचा अधिकारच नसल्याने मतदानही करणार नाही, असा इशारा दिला आहे.

निवडणूक लढण्याचा अधिकार नाही, तर मतदानही करणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ज्या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत तिथे गोंडगोवारी जातीच्या उमेदवारांनी अनुसूचित जमाती प्रवर्गात उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केला; पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी शेकडो उमेदवारांचा अर्ज रद्द करून त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले. त्यामुळे गोंडगोवारी समाजाने निवडणूक लढण्याचा अधिकारच नसल्याने मतदानही करणार नाही, असा इशारा दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, घाटांजी, बाभूळवाडा या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ज्या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे तिथे गोंडगोवारी जातीच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले. अर्जासोबत त्यांनी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र व त्यासाठीची पोच पावतीही जोडली. पण, ३१ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत अनुसूचित जमातीचा लाभ देय होत नसल्याचे सांगून त्यांचा अर्ज नामंजूर केला. यात सदाशिव ठाकरे, राजू बोटरे, नलिनी ठाकरे, ज्योत्स्ना चौधरी, जयश्री वाघाडे या उमेदवारांचा समावेश आहे. असे शेकडो गोंडगोवारी जातीचे उमेदवार यवतमाळ तालुक्यात असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीत अनुसूचित जमातीची लोकसंख्या बघून एसटीचे रोस्टर निघाले. आम्ही निवडणूक लढण्यास अपात्र होतो, तर आमचा अर्ज का? स्वीकारला असा सवाल या उमेदवारांनी केला आहे.
- गोंडगोवारी ना एसबीसी प्रवर्गात आहे, नाही अनुसूचित जमाती प्रवर्गात. पण, आमच्या समाजाच्या आधारेच स्थानिक स्वराज्य संस्थेत अनुसूचित जमातीचे रोस्टर निघत आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रोस्टर काढताना समाजाची लोकसंख्या अनुसूचित जमातीतून वगळावी. आमच्यावर होत असलेल्या अन्यायामुळे जिथे जिथे राखीव मतदारसंघ आहे, तिथे तिथे गोंडगोवारी जमात निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे.
कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना