‘पंचम पॅशन’ च्या मेलोडीमध्ये रसिक झाले नॉस्टॅल्जिक
By Admin | Updated: August 24, 2014 01:14 IST2014-08-24T01:14:56+5:302014-08-24T01:14:56+5:30
आर. डी. बर्मन अर्थात पंचमदा म्हणजे नावातच पंचम असलेले चतुरस्र संगीतकार. त्यांनी संगीतबद्ध केलेली गीते पिढ्या बदलल्या तरी रसिकांच्या कायम स्मरणात आहेत. पंचमदांच्या संगीताचे

‘पंचम पॅशन’ च्या मेलोडीमध्ये रसिक झाले नॉस्टॅल्जिक
आर. डी. बर्मन यांची गीते : वाद्यवृंदाच्या माधुर्याने भारलेला कार्यक्रम
नागपूर : आर. डी. बर्मन अर्थात पंचमदा म्हणजे नावातच पंचम असलेले चतुरस्र संगीतकार. त्यांनी संगीतबद्ध केलेली गीते पिढ्या बदलल्या तरी रसिकांच्या कायम स्मरणात आहेत. पंचमदांच्या संगीताचे एक वैशिष्ट्य होते. प्रत्येक वाद्याला त्यांच्या संगीतात विशेष महत्त्व असायचे. मायनरचा उपयोगही त्यांनी अनेक गीतात मोठ्या खुबीने केला आहे. याशिवाय सर्वच वाद्यांचे माधुर्य त्यांनी त्यांच्या संगीतात कौशल्याने उपयोगात आणले. त्यामुळेच पंचमदांनी संगीतबद्ध केलेली गीते रसिकांच्या मनात आहेत. त्यांच्या गीतांचे अनेक कार्यक्रम होतात आणि रसिकांना त्याचा आनंदही मिळतो. पण सृजनतर्फे प्रसिद्ध बासरीवादक अरविंद उपाध्ये यांनी पंचमदांच्या गीतांचे वाद्यवृंदावर सादरीकरण करण्याचा अनोखा प्रयोग केला आणि रसिकांनी या प्रयोग आनंदाने उचलून धरला. तयारीचे वादक आणि विविध वाद्यांच्या साथीने फुललेल्या पंचमदांच्या गीतांनी या कार्यक्रमात रसिक ‘नॉस्टॅल्जिक’ झाले.
सृजनतर्फे या ‘नॉस्टॅल्जिक मेलोडी आॅफ आर. डी. बर्मन पंचम पॅशन’ वाद्यवृंदांच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक सभागृहात करण्यात आले. यात प्रामुख्याने अरविंद उपाध्ये यांची बासरी आणि आशिष साहू यांनी हवाई गिटारवर पंचमदांच्या गीतांचे सादरीकरण करून रसिकांची दाद घेतली. बासरी या वाद्याचे वैशिष्ट्य, त्याचा गोडवा आणि अरविंद उपाध्ये यांची मधाळ फुंक तर हवाई गिटारवर आशिष शाहू यांनी केलेली मींडची कमाल गीतांचे सौंदर्य अधिक वाढविणारी होती. अनेक गीतात तर मूळ गीतापेक्षाही काही खास जागा या वादकांनी आपल्या कौशल्याने घेतल्याने गीतांचा गोडवा अधिक वाढला. त्यात रसिकांकडून अनेकदा वन्समोअरची मागणी होत होती. या कार्यक्रमाची संकल्पना अरविंद उपाध्ये यांची होती. कसलेले कसबी कलावंत, संगीताची जाण आणि आपापल्या वाद्यांवर असणारी हुकूमत तसेच वाद्याची वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या वादनाने हा अनुभव विलक्षण माधुर्याने भरला होता. शोले चित्रपटाच्या संकल्पनेवर आधारित धून सादर करून या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे प्रारंभापासूनच रसिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. या अपेक्षांवर खरे उतरत सर्व वादकांनी रसिकांना एक सुरेल सफर घडविली. कार्यक्रमात तुंबा, कोंगोवर रघुनंदन परसटवार, तबला आणि पर्कशनवर अशोक टोकलवार, कीबोर्ड, पियानीकावर परिमल वाराणशीवार, लीड आणि ऱ्हीदम गिटार प्रसन्न वानखेडे, रिंकु निखारे यांनी बेस गिटार, ड्रम्सवर सुभाष वानखेडे यांनी वादन केले.
कार्यक्रमाचे नेटके आणि नेमकेपणाने निवेदन नासिर खान यांनी केले. पंचमदांच्या अनेक आठवणींना हात घालत त्यांनी या कार्यक्रमाची रंगत वाढविली. या कार्यक्रमाचे संयोजन नितीन जोशी यांनी चोखपणे केले. प्रकाशयोजना विशाल यादव यांची तर रंगमंच सजावट राजेश अमीन यांनी केली. यावेळी पंचमदांच्या अनेक लोकप्रिय गीतांनी हा कार्यक्रम रंगतदार झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार, पी. एन. रघुनाथ, पारखी, आशिष फडणवीस, अशोक बन्सोड, मोहता, सुहास मोरे, शैलेश दाणी उपस्थित होते. (प्रतिनिधी)