कोरोनाच्या १५ रुग्णांपैकी एकाचेही लसीकरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST2021-08-12T04:12:02+5:302021-08-12T04:12:02+5:30
नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. १८ वर्षांवरील तरुणांसाठी नि:शुल्क लसीकरणाची मोहीम ...

कोरोनाच्या १५ रुग्णांपैकी एकाचेही लसीकरण नाही
नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. १८ वर्षांवरील तरुणांसाठी नि:शुल्क लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु काही लोकांमध्ये लसीकरणाप्रति उदासीनता कमी होताना दिसून येत नाही. मेयो, मेडिकल व एम्समध्ये भरती असलेल्या कोरोनाच्या १५ रुग्णांमध्ये एकाही रुग्णाचे संपूर्ण लसीकरण झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, जानेवारी ते जून या कालावधीत ३ लाख ५३ हजार २८५ रुग्णांची नोंद झाली, तर ५ हजार ७५ रुग्णांना जिवाला मुकावे लागले. यातच आता संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ या कोरोना विषाणूच्या बदललेल्या रूपाने चिंता वाढवली आहे. नागपूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा असला तरी साठा उपलब्ध झाल्यास आठवड्यातून साधारण तीन ते चार दिवस पूर्ण क्षमतेने लसीकरण होत आहे. इतर दिवशी ४५ वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण केंद्र सुरू ठेवले जात आहे. खासगीमध्येही थेट नोंदणी करून लसीकरण सुरू आहे. परंतु काही जण लसीकरणाकडे अद्यापही पाट करून आहेत. परिणामी त्यांना कोरोनाच्या गंभीरतेला सामोर जावे लागत असल्याचे चित्र आहे. सध्या मेयोमध्ये भरती असलेल्या कोरोनाच्या दोन्ही रुग्णांचे लसीकरण झालेले नाही. एम्समध्ये तीन रुग्ण भरती आहेत. यातील एकाने पहिला डोस घेतला, तर दोघांनी एकही डोस घेतला नाही. मेडिकलमध्ये ‘सारी’चे आठ, तर कोरोनाचे दोन रुग्ण आहेत. या दहाही रुग्णांचे लसीकरण झालेले नाही.
:: जिल्ह्यात कधी किती पॉझिटिव्ह?
वार : पॉझिटिव्ह
बुधवार : ०५
गुरुवार : १२
शुक्रवार : ०६
शनिवार : ०१
रविवार : ०५
सोमवार : ०३
मंगळवार : ०५