अधिवेशनानंतर साकार झाला असहकार आश्रम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST2020-12-27T04:06:56+5:302020-12-27T04:06:56+5:30
कमल शर्मा नागपूर : १९२० साली २६ ते ३१ डिसेंबर या काळात नागपुरात झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ऐतिहासिक ठरले. ...

अधिवेशनानंतर साकार झाला असहकार आश्रम ()
कमल शर्मा
नागपूर : १९२० साली २६ ते ३१ डिसेंबर या काळात नागपुरात झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ऐतिहासिक ठरले. असहकार आंदाेलन याच अधिवेशनाची देणगी हाेय, ज्यामुळे स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. नागपुरातही याचा प्रभाव पडला. ज्या क्राॅडक टाऊन परिसरात हे अधिवेशन झाले त्या भागाला आज काँग्रेसनगर म्हणून ओळख मिळाली. या अधिवेशनामुळे एका आश्रमाची निर्मिती झाली, ज्याला असहकार आश्रम म्हणून संबाेधले गेले. मात्र दुर्दैवाने बहुतेकांना याचा विसर पडला.
हे अधिवेशन ३१ डिसेंबर १९२० राेजी संपन्न झाले. असहकार आंदाेलनाची रूपरेखा तयार झाली हाेती. त्यातच शहरात असहकार आश्रम उभारण्याचा विचार पुढे आला. सेठ पूनमचंद राकां (तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५९ च्या नागपूर अधिवेशनात त्यांना त्यागमूर्ती पदवी दिली हाेती) यांनी सिरसपेठ येथे स्वत:ची जागा दिली आणि आश्रम साकार झाले. त्याची जबाबदारी महात्मा भगवानदीन यांना साेपविण्यात आली. जनरल मंचरशा आवारींसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते या आश्रमाशी जुळले हाेते. नागपूरचे माजी खासदार गेव्ह आवारी यांनी माहिती देताना सांगितले, लाेकांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने ८ एकरांमध्ये हा आश्रम बांधण्यात आला हाेता. आजच्या जनरल मंचरशा आवारी चाैकापासून अशाेक चाैकापर्यंत पसरलेल्या या आश्रमात चरख्यावर सूत कातण्याचे काम हाेत हाेते. पशुपालनासह शेतीही केली जात हाेती. लघु उद्याेगाच्या माध्यमातून नागरिकांना स्वयंराेजगाराशी जाेडले जात हाेते. ‘साधे जीवन, उच्च विचार’ असे आश्रमाचे ब्रीद हाेते. जवळच जनरल आवारी यांना जागा देण्यात आली हाेती, ज्या ठिकाणी आजही गेव्ह आवारी यांचे कुटुंब राहते. मात्र देश स्वातंत्र्याकडे वाटचाल करीत असतानाच आश्रमाचे अस्तित्व अस्त व्हायला लागले. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हा आश्रम वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाशी जाेडण्यात आला. आता येथे लाेकांची घरे व इमारती आहेत.
...तर सेवाग्रामपेक्षा जुना असता आश्रम
सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये आश्रमाची स्थापना केली हाेती. मात्र असहकार आश्रम त्यापूर्वीच स्थापण्यात आला. त्यामुळे हा आश्रम असता तर त्याचा इतिहास सेवाग्रामपेक्षा जुना असता. सेवाग्राममध्ये गांधीजींचे वास्तव्य हाेते पण नागपूरचा आश्रम असहकार आंदाेलनाची देण हाेते. गांधीजी जेव्हा नागपूरला यायचे तेव्हा आश्रमात असलेल्या पूनमचंद राकां यांच्या निवासस्थानी थांबायचे, अशी माहिती गेव्ह आवारी यांनी दिली.