नामनिर्देशित सदस्यसंख्या अपूर्णच
By Admin | Updated: October 24, 2016 02:50 IST2016-10-24T02:50:57+5:302016-10-24T02:50:57+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरणावर राज्य शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाच्या

नामनिर्देशित सदस्यसंख्या अपूर्णच
नागपूर विद्यापीठ : अद्यापही विधिसभेत १४ सदस्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरणावर राज्य शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर कुलगुरूंद्वारे नामनिर्देशित सदस्यांची वर्णी लागली आहे. कुलगुरूंनी विधिसभेवर पाच सदस्यांचे नामनिर्देशन केले असले तरी विद्यापीठ कायद्यानुसार ही संख्या आणखी १४ ने वाढू शकते. विधिसभेतील सदस्यसंख्या वाढली असली तरी अद्यापही इतर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षाच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विद्यापीठातील निवडणुकांना ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत स्थगिती देण्यात आली असली तरी यापुढे प्राधिकरणांत विद्यापीठातील पदावरील अधिकाऱ्यांसोबतच विविध नामित सदस्यांचादेखील समावेश राहणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे राजपत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी विधिसभा, विद्वत् परिषद, बीसीयूडी, परीक्षा मंडळ आणि निरंतर व प्रौढ शिक्षण मंडळावर एकूण १७ सदस्यांना नामित केले आहे. विधिसभेत त्यांनी पाच सदस्यांना नामनिर्देशित केले. यात डॉ.एम.व्ही.खापर्डे, डॉ.मोहन काशीकर, डॉ.शैलेंद्र लेंडे, सतीश होले, मोहन रामटेके यांचा समावेश आहे. मात्र कुलगुरू त्यांच्या अधिकारात जिल्हा परिषद, महानगरपालिका सदस्यांनादेखील नामित करू शकतात. या सदस्यांच्या नावाची घोषणाच झालेली नाही. अद्याप महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहितादेखील लागू झालेली नाही. अशा स्थितीत या सदस्यांच्या नावाची घोषणा का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)