कोराडीच्या विकासासाठी नासुप्र नोडल एजन्सी
By Admin | Updated: May 28, 2015 02:27 IST2015-05-28T02:27:26+5:302015-05-28T02:27:26+5:30
कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान या तीर्थस्थळाच्या विकास आराखड्याची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने नासुप्रला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.

कोराडीच्या विकासासाठी नासुप्र नोडल एजन्सी
नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान या तीर्थस्थळाच्या विकास आराखड्याची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने नासुप्रला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. याशिवाय या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समिती तर जिल्हास्तरावर या विकास कामांच्या अंमलबजावणीवर संनियंत्रण ठेवण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
कोराडी तीर्थक्षेत्र आराखड्यास अंतिम मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये वित्त व नियोजन मंत्री (उपाध्यक्ष) तर सदस्य म्हणून पाल्कमंत्री, वित्त व नियोजन राज्यमंत्री, रामटेकचे खासदार, विधानसभा सदस्य, नासुप्र सभापती, नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव (वित्त), आराखड्याशी संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, नागपूर रेल्वे परिक्षेत्राचे महाव्यवस्थापक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे. नगर विकास विभागाचे सचिव हे समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. ही शिखर समिती नियोजित आराखडा व त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मंजुरी देईल. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी वेळोवेळी आढावा घेईल. याशिवाय जिल्हास्तरावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय संनियंत्रण समिती नेमण्यात आली आहे. नासुप्रने तयार केलेल्या विकास आराखड्याची छाननी करून तो अंतिम मंजुरीसाठी शिखर समितीकडे सादर करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय समितीवर असेल. विकास आराखड्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या विकासकामांचा वेळोवेळी आढावा घेणे, सर्व संबंधित प्रशासकीय विभाग, केंद्र शासनाचे प्रशासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधून कामाच्या प्रगतीत येणाच्या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या समितीची असेल. (प्रतिनिधी)