नवीन बांधकामासाठी ‘एनओसी’ आवश्यक
By Admin | Updated: July 2, 2015 03:24 IST2015-07-02T03:24:48+5:302015-07-02T03:24:48+5:30
मेट्रो रेल्वेच्या दोन्ही बाजूला २० मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

नवीन बांधकामासाठी ‘एनओसी’ आवश्यक
मेट्रो रेल्वेचा २० मीटरचा नियम : बृजेश दीक्षित यांची माहिती
आनंद शर्मा नागपूर
मेट्रो रेल्वेच्या दोन्ही बाजूला २० मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. पण या टप्प्यात येणारे बांधकाम पाडण्यात येणार नसल्याचा खुलासा नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी केला आहे.
दीक्षित म्हणाले, सीताबर्डीचा परिसर सोडल्यास मेट्रो रेल्वे शहरातील रस्त्याच्या मध्यवर्ती भागातून जाणार आहे. सीताबर्डी आणि त्याच्या लगतच्या परिसरात रस्त्याच्या एका बाजूला धावणार आहे. अशा स्थितीत मेट्रो रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला २० मीटरपर्यंत नवीन बांधकाम करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. जास्त गरज भासल्यास बांधकामाला हात लावण्यात येईल. या मार्गावर जर कुणी बांधकाम करण्यास इच्छुक असेल तर त्यांना प्रारंभी ‘एनएमआरसीएल’कडून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. मेट्रो रेल्वेच्या मार्गावर रेल्वे लाईनसह एकूण ३६ मेट्रो स्थानके बनविण्यात येणार आहे. त्यासाठी जास्त जागेची गरज भासणार आहे. एखादे बांधकाम २० मीटरच्या टप्प्यात असेल तर स्थानक बनविणे त्रासदायक ठरेल. त्यामुळे कोणतेही बांधकाम पडू नये, यावर विशेष भर राहणार आहे.
फंडाची कमतरता नाही
प्रकल्पासाठी फंडाची कमतरता भासणार नाही, असा दावा दीक्षित यांनी केला. कंपनीकडे ५०० कोटी रुपये उपलब्ध आहे. या फंडातून यावर्षी काम होणार आहे. जर्मनी आणि फ्रान्स येथील कंपन्या प्रकल्पाला कोट्यवधींचे कर्ज देणार आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयातर्फे या कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. कर्जाच्या अटी व शर्ती तयार करण्यात येत असून लवकरच करार होण्याची शक्यता आहे.
सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा
प्रकल्पाला गती प्रदान करण्यासाठी लवकरच सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार असून पुढील आठवड्यात निविदा काढण्यात येईल. या निविदा जागतिक स्तरावर राहतील. राईट्स आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (डीएमआरसी) प्रकल्पाचे अंतर्गत सल्लागार आहेत. दोन्ही कंपन्यांनी सल्लागार नियुक्तीसाठी दोनदा मसुदा तयार केला होता. पण तो कंपनीने नाकारला. आता तिसऱ्यांदा मसुदा तयार करण्यात येत आहे. प्रकल्पाचे बहुतांश काम सल्लागाराच्या नियंत्रणाखाली होईल. गुणवत्तापूर्ण कामावर भर राहणार आहे.
खापरीमध्ये तांत्रिक कार्य सुरू
मिहान-खापरीपर्यंतच्या ४.५ कि़मी.च्या मेट्रो रेल्वे मार्गावर एक महिन्यापूर्वी काम सुरू झाले आहे. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला ८६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. स्ट्रक्चरल डिझाईन, मटेरियल टेस्टिंग, अलायन्मेंटची पुनर्तपासणी आणि पिलर तयार करण्याचे काम कंपनी करीत आहे. दीक्षित यांच्याशी चर्चेदरम्यान ‘एनएमआरसीएल’चे उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) डॉ. सुमंत देऊळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
महसुली जमीन हस्तांतरणावर बैठक
मेट्रो रेल्वेसाठी आवश्यक ‘महसुली जमीन हस्तांतरणावर’ विभागीय आयुक्त अनुपकुमार आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यासोबत बृजेश दीक्षित यांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी एसआरपीएफ कमांडंट संजय दराडे उपस्थित होते. हिंगणा येथे मेट्रो कार डेपो तयार करण्यासाठी आवश्यक महसूल विभागाच्या जमिनीवर सकारात्मक चर्चा झाली. अशीच एक बैठक मेट्रो हाऊसमध्ये मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आणि मनपाच्या अन्य अधिकाऱ्यांसोबत झाली होती. त्यावेळी मनपा जमिनीच्या हस्तांतरणावर चर्चा झाली. यामध्ये मेट्रो रेल्वेच्या मार्गात येणारे स्ट्रीट लाईट, वीज पुरवठा लाईन, वॉटर पाईपलाईन, सिवरलाईन हटविण्यावर चर्चा झाली. यासह प्रस्तावित मेट्रो स्टेशनच्या परिसरात पार्किंगची तरतूद आणि फिडर बस सेवेवरही चर्चा करण्यात आली.