‘एनओबीडब्ल्यू’ आव्हान स्वीकारण्यास तयार

By Admin | Updated: April 25, 2016 02:54 IST2016-04-25T02:54:41+5:302016-04-25T02:54:41+5:30

बँकांचे विलीनीकरण, एकत्रीकरण, खासगीकरण, वाढते अनुत्पादन कर्ज खाते, कंत्राटी पद्धतीचा भडीमार,

'NOBW' is ready to accept the challenge | ‘एनओबीडब्ल्यू’ आव्हान स्वीकारण्यास तयार

‘एनओबीडब्ल्यू’ आव्हान स्वीकारण्यास तयार

रामनाथ किणी यांचे प्रतिपादन : १० मे रोजी संसदेपुढे आंदोलन
नागपूर : बँकांचे विलीनीकरण, एकत्रीकरण, खासगीकरण, वाढते अनुत्पादन कर्ज खाते, कंत्राटी पद्धतीचा भडीमार, अपुरी कर्मचारी संख्या, उद्योगाची हळुवार वाढ, कर्मचाऱ्यांवर अनेकांगी जबाबदाऱ्या आदी आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय बँक कर्मचारी फेडरेशन (एनओबीडब्ल्यू) तयार असल्याचे उद्गार एनओबीडब्ल्यूचे अखिल भारतीय अध्यक्ष रामनाथ किणी यांनी येथे काढले.
राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त एनओबीडब्ल्यूच्या काँग्रेसनगर येथील केंद्रीय कार्यालयात आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भामसंचे विदर्भ प्रदेशचे महामंत्री अशोक भुताड होते.
कर्मचाऱ्यांच्या हिताचे
रक्षण करणार
किणी म्हणाले, फेडरेशन स्थापनेपासूनच अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहे. यापुढेदेखील समाज, बँकिंग उद्योग व कर्मचारी यांच्यावरील संकटाचा मुकाबला करण्यात येणार आहे. विकसित देशांच्या प्रभावाखाली भारतात विघातक शर्ती लागू करणाऱ्या डंकेल प्रस्तावाला विरोध करण्यासाठी संघटनेने भारतीय मजदूर संघाच्या मार्गदर्शनाखाली देशव्यापी आंदोलन केले होते. १९८६ मध्ये भारतीय बँकिंग उद्योगात बदल सुचविणाऱ्या नरसिम्हन समितीच्या अयोग्य शिफारशींविरुद्ध फेडरेशनने केलेल्या आंदोलनामुळे शासनास माघार घ्यावी लागली होती. त्याचप्रमाणे बँकिग सुधारणा व खंडेलवाल समितीविरुद्धही आवाज उठविला होता. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी फेडरेशन कार्यरत असल्याचे किणी यांनी स्पष्ट केले.
बँकांच्या खासगीकरणाला विरोध
किणी म्हणाले, १९६७ च्या पहिल्या वेतन करारापासून नुकत्याच झालेल्या दहाव्या द्विपक्ष करारापर्यंत केलेला संघर्ष हे एक उत्तम उदाहरण आहे. केवळ फेडरेशनच्या पाठपुराव्यामुळे अंदाधुंद संगणीकरणाचा वेग थोपविला गेला. बँक कर्मचाऱ्यांना पेन्शनचा दुसरा विकल्प मिळाला. १५ टक्के पगारवाढ मिळाली. सध्याच्या निवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा व्हावी, याकरिता संघटना प्रयत्नशील असून प्रश्न लवकरच सुटेल, अशी चिन्हे आहेत. भरती, थकित कर्जदारांवर कारवाई, खासगीकरणाला विरोध, महिला कर्मचाऱ्यांना सुविधा आदी मागण्यांसाठी १० मे रोजी संसदेसमोर धरणे कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विदर्भ बँक कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत खानझोडे, महामंत्री प्रकाश सोवनी, कार्यालय सचिव राजीव पांडे यांच्यासह अर्चना सोवनी, विनायक जोशी, अरविंद भुमराळकर, श्याम हुद्दार, नितीन बोरवणकर, सुरेश चौधरी, महेंद्र भिसीकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'NOBW' is ready to accept the challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.