‘नोबल ट्रूथ’ म्हणजे आंबेडकरवाद्यांना मिळालेली बुद्धगाथा
By Admin | Updated: September 21, 2015 03:14 IST2015-09-21T03:14:20+5:302015-09-21T03:14:20+5:30
स्मृतीशेष केतन पिंपळापुरे हे प्रसिद्ध कवी होते.

‘नोबल ट्रूथ’ म्हणजे आंबेडकरवाद्यांना मिळालेली बुद्धगाथा
काव्यसंग्रहाचे प्रकाशन : वसंत शेंडे यांचे प्रतिपादन
नागपूर : स्मृतीशेष केतन पिंपळापुरे हे प्रसिद्ध कवी होते. आंबेडकरी कवितांना वैश्विक व्यासपीठावर घेऊन जाण्याची शाश्वती त्यांच्या कवितांमध्ये होती. आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित असलेल्या पिंपळापुरे यांनी साकारलेला ‘नोबल ट्रूथ’ म्हणजे देशातीलच नव्हे तर विश्वातील आंबेडकरवाद्यांना मिळालेली बुद्धगाथा होय, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत व समीक्षक प्रा. डॉ. वसंत शेंडे यांनी येथे केले.
समता सैनिक दल व समता संगर प्रकाशन यांच्याद्वारा स्मृतीशेष मार्शल केतन पिंपळापुरे यांच्या ‘नोबल ट्रूथ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादनपर कार्यक्रम रविवारी देशपांडे सभागृहात पार पडला तेव्हा मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. सारनाथ येथील महाबोधी सोसायटी आॅफ इंडियाचे सचिव भदंत शिवली महाथेरो यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अॅड. विमलसूर्य चिमणकर हे अध्यक्षस्थानी होते. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई , आंबेडकरी कवी व समीक्षक मोतीराम कटारे, डॉ. प्रकाश राहुले प्रमुख अतिथी होते.
अॅड. चिमणकर यांनी अध्यक्षीय भाषणात नोबल ट्रूथ म्हणून केतन बोलत नसून तो जीवनातील सत्याचे प्रवचन करतांना दिसून येतो, असे सांगताच त्यांच्या भावना उचंबळून आल्या. भदंत शिवली महाथेरो म्हणाले, बुद्ध समजण्यासाठी धम्माला समजून घेणे आवश्यक आहे. प्रकाश राहुले म्हणाले ‘नोबल ट्रूथ’ हे महाकाव्य आहे. इतके चांगले लिखाण मी मराठीत वाचले नाही. कटारे म्हणाले, नोबल ट्रूथ हे आपल्याला निब्बानाच्या दिशेने घेऊन जातो. सुनील सारीपुत्त यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिवंगत केतन पिंपळापुरे होते, असे स्पष्ट केले. प्रकाश दार्शनिक यांनी प्रास्ताविक केले. अशोक जांभुळकर आणि राजेश भारती यांनी संचालन केले. अशोक बोंदाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पाच लाखाचा कृतज्ञता निधी अर्पण
समता सैनिक दलाच्या पुढाकाराने स्मृतिशेष मार्शल केतन पिंपळापुरे यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचा कृतज्ञता निधी अर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याप्रसंगी दिवंगत केतन पिंपळापुरे यांच्या पत्नी केतकी आणि मुलगा कॅसाब्लाँका यांना भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भदंत शिवली महाथेरो, किरण संघरक्षक सुखदेवे आणि सुजाता हबीर रंगारी यांच्या हस्ते ५ लाखाचा कृतज्ञता निधी अर्पण करण्यात आला. उर्वरित निधी लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.