‘इमर्जन्सी’साठी नाही एकही ‘एक्स्ट्रा कोच’
By Admin | Updated: February 7, 2015 02:00 IST2015-02-07T02:00:49+5:302015-02-07T02:00:49+5:30
रेल्वे गाडीतील एसी नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होते. तक्रार करूनही त्याचा काहीच फायदा होत नाही. प्रवाशी चेनपुलींग करून गोंधळ घालतात.

‘इमर्जन्सी’साठी नाही एकही ‘एक्स्ट्रा कोच’
दयानंद पाईकराव नागपूर
रेल्वे गाडीतील एसी नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होते. तक्रार करूनही त्याचा काहीच फायदा होत नाही. प्रवाशी चेनपुलींग करून गोंधळ घालतात. एखाद्या कोचमध्ये तांत्रीक बिघाड होतो. तर काही कोचमधील पंखे बंद पडतात. नागपूर रेल्वेस्थानकावर ही स्थिती नेहमीच उद्भवते. नागपुरात एकही ‘एक्स्ट्रा कोच’ नसल्याची धक्कादायक माहिती असून यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांनी गोंधळ घालण्याच्या घटनात सातत्याने वाढ होत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज १०० ते ११० रेल्वेगाड्या आणि ४० ते ५० हजार प्रवासी ये-जा करतात. अनेकदा रेल्वेगाड्यांच्या कोचमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवासी गाडीतील टीसीला त्याची तक्रार करतात. परंतु त्यांना दुरुस्तीच्या आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर अनेकदा प्रवाशांनी गोंधळ घातल्याच्या घटना घडल्या आहेत. बिघाड दुरुस्त झाल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन प्रवासी वारंवार चेन पुलींग करतात. उन्हाळ्यात एसी नादुरुस्त होण्याच्या अनेक घटना घडतात. यात इतर प्रवाश्यांनाही मनस्ताप होतो. वेळ निभावून नेण्यासाठी संबंधित बिघाड दुरुस्त करून गाडी पुढील प्रवासाला रवाना करण्यात येते. परंतु या पासून कायमचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आजपर्यंत झाला नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर अशी आपातकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी काही अतिरिक्त कोच ठेवण्याची गरज आहे. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर असा एकही अतिरिक्त कोच ठेवण्यात येत नाही. मुंबईला मात्र अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास अतिरिक्त कोचची व्यवस्था आहे. त्यामुळे नागपुरातही अतिरिक्त कोच ठेऊन प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)