तेरे बिना जिंदगी से कोई ‘शिकवा’ नही..!
By Admin | Updated: February 5, 2015 01:06 IST2015-02-05T01:06:45+5:302015-02-05T01:06:45+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीतले सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणजे राहुल देव बर्मन. प्रत्येक गीतप्रकार सारख्याच ताकदीने सांभाळणारे आणि वाद्यसंगीताची अप्रतिम मेलोडी साधणारे आर. डी. काळ बदलला,

तेरे बिना जिंदगी से कोई ‘शिकवा’ नही..!
आर.डी. बर्मन यांच्या गीतांची : स्थानिक कलावंतांचे सादरीकरण
नागपूर : हिंदी चित्रपटसृष्टीतले सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणजे राहुल देव बर्मन. प्रत्येक गीतप्रकार सारख्याच ताकदीने सांभाळणारे आणि वाद्यसंगीताची अप्रतिम मेलोडी साधणारे आर. डी. काळ बदलला, पिढ्या बदलल्या पण कालबाह्य होऊ शकले नाही. त्यांनी संगीतबद्ध केलेले गीत ऐकणे म्हणजे आपल्याच जीवनातील एखाद्या अनुभवाशी समरस होता येण्याचा आनंद आहे. त्यामुळे आर. डी.ची गीते ऐकताना पुन:प्रत्ययाचा आनंद ठरलेलाच असतो. त्यात गीताचा आशय आणि भाव ओतणारा कसबी गायक आणि नेमकेपणाने वाद्यसंगीताचा परिणाम साधणारे वादक असले तर हा आनंद अधिक वाढतो. सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमात आर. डी. बर्मन यांच्या गीतांनी एक सुरेल मैफिल सजली.
माधवी पांडे यांच्या संकल्पनेतून या ‘शिकवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गीतांचे संदर्भ सांगत आणि आर. डीं. च्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवणारे त्यांचे निवेदन आणि रसिली गीते यामुळे हा कार्यक्रम रंगतदार झाला. विशेषत: आर. डीं.ची अनेक अनवट गीते या कार्यक्रमात एकत्रित ऐकण्याचा जरा दुर्मिळ योग कार्यक्रमात आल्याने रसिकांनीही गीतांच्या निवडीबाबत समाधान व्यक्त केले. नागपूरचा किशोरकुमार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सागर मधुमटकेने यावेळी रसिकांना जिंकले. आर. डी. चे आवडते गायक म्हणजे किशोरकुमार आणि आशा भोसले. त्यात खास किशोरकुमारच्याच अंदाजात सागरने तबीयतीने सादरीकरण करुन रसिकांची दाद घेतली. जवळपास प्रत्येक गीताला वन्समोअर देत हा कार्यक्रम रसिकांनी ‘एन्जॉय’ केला. त्यात शहरातील गुणी गायिका मंजिरी वैद्य, श्रुती चौधरी आणि सारंग जोशी यांनी समरसून गीत सादर क रताना रसिकांना आनंद दिला.
कार्यक्रमाचा प्रारंभ ‘तेरे बिना जिंदगी से कोई...’ या गीताने करण्यात आला. त्यानंतर अनेक लोकप्रिय आणि भावनांच्या तळाशी जाणारी गीते प्रामुख्याने या कार्यक्रमात सादर करण्यात आली. यात ‘तुमसे नाराज नही जिंदगी..., मेरा कुछ सामान तुम्हारे पास.., बिती ना बिताई रैना..., क्या जानु सजन.., तुम बिन जाऊ कहाँ..., अब के ना सावन बरसे..., निसुल्ताना रे.., घर आजा घिर आयी..., नाम गुम जाएगा.., इस मोड से जाते है..., प्यार करनेवाले प्यार करते है..., गुलाबी आँखे जो तेरी देखी..., करवटे बदलते रहे..., दम मारो दम..’ आदी प्रत्येक गीताने रंगत आणली.
कार्यक्रमातल्या प्रत्येकच गीताचे सादरीकरण सर्वच गायकांनी तयारीने केल्याने कार्यक्रमाने उंची गाठली. कितीवेळा आणि कोठे वन्समोअर द्यावा, याचा पेच आयोजकांना आणि रसिकांनाही पडला.
याप्रसंगी प्रेम, विरह, व्याकुळता, उत्कटता आणि मस्तीभऱ्या गीतांनीही कार्यक्रमाची रंगत वाढविली. ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होगा..., पन्ना की तमन्ना है..., आजा आजा..., कहना है... तुम आ गये हो..., धन्नो की आँखो मे...चांद मेरा दिल...’ आदी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. (प्रतिनिधी)