नळाला नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:44 PM2020-05-15T21:44:19+5:302020-05-15T21:49:42+5:30

महापालिका व ओसीडब्ल्यूने २४ बाय ७ पाणी वितरण योजनेंतर्गत नागरिकांची पाण्याची समस्या आता संपली असे जाहीर केले असले तरी वारंवार या यंत्रणेत त्रुटी आढळून येत आहेत. त्याचा फटका प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व पाण्याचा अपव्यय टाळणाऱ्या नागरिकांना बसत आहे. उन्हाळा तीव्र झाला आहे आणि कोरोनाच्या काळात शासन वारंवार हात धुण्यास व आंघोळ करण्यास सांगत आहे. मात्र, ‘नळाला नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा..’ अशी आळवणी नागरिकांना करावी लागत असल्याचे चित्र आहे.

No tap water, Ghagar Utani Ray Gopala! | नळाला नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा!

नळाला नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा!

googlenewsNext
ठळक मुद्देनळाला अर्धा तास पाणी अन् करंगळीएवढी धारअर्धा ड्रम पाण्यात कसे घालवायचे २४ तास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका व ओसीडब्ल्यूने २४ बाय ७ पाणी वितरण योजनेंतर्गत नागरिकांची पाण्याची समस्या आता संपली असे जाहीर केले असले तरी वारंवार या यंत्रणेत त्रुटी आढळून येत आहेत. त्याचा फटका प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व पाण्याचा अपव्यय टाळणाऱ्या नागरिकांना बसत आहे. उन्हाळा तीव्र झाला आहे आणि कोरोनाच्या काळात शासन वारंवार हात धुण्यास व आंघोळ करण्यास सांगत आहे. मात्र, ‘नळाला नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा..’ अशी आळवणी नागरिकांना करावी लागत असल्याचे चित्र आहे.
जवळपास संपूर्ण शहरात ओसीडब्ल्यू नळाद्वारे पाण्याचे वितरण करत असते. या सेवेसाठी नागरिकांना करही भरावा लागतो. मात्र, पाणी वितरणात कमालीची अनियमितता दिसून येत आहे. काही भागात दिवसातून तीनवेळा पाण्याचा पुरवठा केला जातो तर काही भागात एकही वेळ पाणी बरोबर पोहोचत नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर एक दिवसाआड नळाला पाणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाठोडा, खरबी या भागात अशाच अनियमिततेचा फटका भर उन्हाळ्यात सामान्य नागरिकांना बसत आहे. उन्हाचा ताप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनाच्या काळात शासन-प्रशासनाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दर तासाने २० सेकंदांपर्यंत हात धुणे, दिवसातून दोन वेळा आंघोळ करणे, बाहेरून येताच सर्व कपडे धुण्यास टाकणे असे आवाहन केले जात आहे. मात्र, पाणीच नसेल तर या आवाहनाला दुजोरा कसा द्यावा, हा प्रश्न नागरिकांपुढे आहे. वाठोडा, खरबी, रमणा मारोती परिसरात दिवसातून एक वेळ नळाला पाणी सोडले जाते. मात्र, नळाला येणाऱ्या पाण्याची धार करंगळीपेक्षाही बारीक असते. काही भागात हा पाणीपुरवठा एक तास तर काही भागात अर्धा तासच असतो. करंगळीएवढ्या धारेत धड अर्धा ड्रमही पाणी भरले जात नाही. शिवाय पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. अशा स्थितीत घरात असलेल्या कुटुंबातील सदस्यांना केवळ पिण्यापुरतेच पाणी वापरावे लागत आहे. आंघोळ, कपडे धुणे तर फार लांबची गोष्ट. त्यात उन्हाळा तापत असल्याने कूलरलाही पाणी लागते. मात्र, या भागातील नागरिकांना दिवस व रात्र उष्णतेतच काढावे लागत असल्याचे चित्र आहे.

गर्भवती स्त्रियांची होतेय आबाळ
या काळात ज्यांच्याकडे गर्भवती स्त्रिया आहेत किंवा बाळंतीण आहेत, त्यांची प्रचंड आबाळ होत आहे. बाळंतीण व नवजात अपत्य असलेल्या घरी सातत्याने कपडे धुणे, आंघोळ करणे अशा प्रक्रिया असतात. मात्र, पाणीच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

शहर पुन्हा टँकरयुक्त नागपूरच्या दिशेने!
नळाला पाणी येत नसल्याने या भागातील नगरसेवकांकडे नागरिकांकडून टँकर्सची मागणी वाढली आहे. २४ बाय ७ ही योजना आकारताना शहर टँकरमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा रस्तोरस्ती टँकरच्या फेºया वाढल्याचे दिसून येत आहे.

तक्रार केली तरी काहीच फायदा नाही
नळाला पाणी नाही अशी तक्रार केल्यावर एक जण येतो व तपासणी करून जातो. दोन दिवस व्यवस्थित पाणी येते व नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती असते. तक्रारीचा काहीच लाभ होत नसल्याची प्रतिक्रिया पुष्पा चर्लेवार यांनी दिली. तक्रार एका घरची नसते तर ती त्या परिसरातील असते. तरी येणारा एकाच घरी तपासून निघून जातो. ही समस्या कायमची सोडविण्याची गरज असल्याची भावना वनिता लिचडे यांनी व्यक्त केली.

Web Title: No tap water, Ghagar Utani Ray Gopala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.