कारागृह नव्हे यातनागृह !
By Admin | Updated: July 4, 2015 03:06 IST2015-07-04T03:06:34+5:302015-07-04T03:06:34+5:30
गत १४ महिन्यापासून आपण नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होतो. वास्तविक हे कारागृह नसून यातनागृह आहे,

कारागृह नव्हे यातनागृह !
माओवादी नेता साईबाबाने जामिनावर सुटका होताच मांडली व्यथा
नागपूर : गत १४ महिन्यापासून आपण नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होतो. वास्तविक हे कारागृह नसून यातनागृह आहे, अशी व्यथा नक्षली कारवाया केल्याचा आरोप असलेल्या माओवादी नेता प्रा. जी. एन. साईबाबा याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. कारागृह ही सुधारणा घडवून आणणारी संस्था असली पाहिजे, यावरही त्याने भर दिला.
मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असलेल्या साईबाबाला वैद्यकीय उपचार घेता यावे म्हणून तीन महिन्यासाठी तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचा आदेश देताच शुक्रवारी दुपारच्या वेळी त्याला कारागृहातून सोडण्यात आले.
अपंगाच्या तीन चाकी वाहनाने तो कारागृहाच्या बाहेर पडला. त्यावेळी त्याला पत्रकारांनी घेरले. त्याने पत्रकारांपुढे कारागृहात आलेला थरार अनुभवच कथित केला.
तो म्हणाला, कारागृह ही सुधारणा घडवून आणणारी संस्था असली पाहिजे, ते यातनागृह नसावे. कारागृहातील यातना हेच आपल्या आजाराचे कारण होय, असेही तो म्हणाला.
स्वत:चे स्वातंत्र्य आणि हक्क गमावल्यानंतर कसे वाटते, याबाबतचा अनुभव आपण स्वत: घेतला आहे. माणसाच्या जीवनात स्वातंत्र्याचे किती मूल्य आहे, याची जाणीव आपणास कारागृहातून बाहेर पडल्यानंतर झाली. कारागृह हे सुधारणा घडवून आणणारी संस्था असली पाहिजे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुधारणा घडवून आणणारा अधिकारी म्हणून वागले पाहिजे.
कारागृहात प्रत्येकालाच यातना दिल्या जातात. त्याला मारहाण केली जाते. त्याचा अपमान केला जातो आणि अमानुषरीत्या छळ केला जातो. कारागृहात कैद्यांचा होणारा भयावह आणि अमानुष छळ आपण स्वत: आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि आजारी पडलो, असेही तो म्हणाला. म्हणूनच कारागृह हे कारागृह नसून यातनागृह आहे. या ठिकाणी मला जेवण आणि औषधही दिले जात नव्हते. हा छळाचाच प्रकार आहे. आपला शारीरिक छळ केला गेला नाही, हे मात्र त्याने मान्य केले. माओवाद्यांशी संबंध असल्यावरून गडचिरोली पोलिसांनी साईबाबाला नवी दिल्लीच्या विद्यापीठासमोरून अटक केली होती. त्यानंतर त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. १४ महिन्यापासून तो कारागृहात बंदिस्त होता. (प्रतिनिधी)