थकबाकीदारांना शास्ती माफी नाही : पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 09:18 PM2020-02-26T21:18:11+5:302020-02-26T21:20:29+5:30

बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या घरटॅक्स व पाणीपट्टी वसुलीवर महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. घरटॅक्स वसुलीतून २०१९-२० या वर्षात ५३१ कोटींचे तर पाणीपट्टीतून १६६ कोटी वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

No penalty waiver for dues: NMC strikes for water levy and property tax | थकबाकीदारांना शास्ती माफी नाही : पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची धडक मोहीम

थकबाकीदारांना शास्ती माफी नाही : पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची धडक मोहीम

Next
ठळक मुद्देआर्थिक परिस्थितीमुळे आयुक्तांचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या घरटॅक्स व पाणीपट्टी वसुलीवर महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. घरटॅक्स वसुलीतून २०१९-२० या वर्षात ५३१ कोटींचे तर पाणीपट्टीतून १६६ कोटी वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. परंतु पाणीपट्टीच्या वित्त वर्षातील बिलाच्या तुलनेत थकीत बिलाची रक्कम मोठी आहे. अशीच अवस्था मालमत्ता कराची असल्याने थकीत करावरील शास्ती माफ केल्यास वसुलीवर परिणाम होणार आहे. यामुळे थकबाकीदारांना शास्ती माफ करणार नसल्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
गतकाळात वेळोवेळी शास्ती माफ करण्यात आली आहे. त्यानंतरही थकबाकी वसुलीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शास्ती माफ करण्याचा अधिकार हा महापालिका कायद्यानुसार आयुक्तांना आहे. सध्याची महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता, शास्ती माफ करण्याचा विचार नसल्याचे आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले आहे. मालमत्ता करापासून २५ जानेवारीपर्यंत २०५ कोटी वसूल झाले आहे. हा आकडा मार्च अखेरीस २६० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही.
पाणीपट्टीतून १६६ कोटींची वसुली अपेक्षित आहे. मनपाच्या तिजोरीत १४० कोटी जमा झाले आहे. पुढील ३५ दिवसात यात १० ते १५ कोटींची भर पडणार आहे. उद्दिष्टपूर्तीच्या दिशेन वसुली असली तरी जुनी थकबाकी १९९ कोटींच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत शास्ती माफ केल्यास मनपाच्या वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी वेळोवेळी शास्ती माफ करून वसुली मोहीम राबविण्यात आली होती. परंतु त्यानंतरही थकबाकी कायम आहे.
वर्ष २०१९-२० मध्ये २,३८८ कोटी खर्चाचा अंदाज आहे तर उत्पन्न २,४०० कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच स्थायी समितीचा अर्थसंकल्प व वास्तविक उत्पन्न यात दरवर्षी २० टक्के तफावत आहे. त्यातच मनपाकडे एकूण ४९५.५१ कोटींची देणी थकीत आहे. यावरून स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ८०० कोटींची कपात होण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या अर्थसंकल्पानंतर निधीअभावी काही मोठे प्रकल्प प्रभावित होण्याची शक्यता आहे.

आयुक्तांच्या अर्थसंकल्पात स्थिती स्पष्ट
महापालिका आयुक्त यांनी वर्ष २०१९-२० चा सुधारित व वर्ष २०२०-२१ चा प्रस्तावित अर्थसंकल्प मांडल्यानंतर महापालिकेच्या आर्थिक स्थितीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यातून ३१ मार्चपर्यंत जमा होणारा महसूल व खर्च आणि दायित्व याची स्थिती स्पष्ट होईल. खर्च व दायित्वानंतर निधी शिल्लक राहत असल्यास आवश्यक सुविधांच्या विकासकामांना प्राधान्याने निधी वाटप केला जाईल, असे प्रशासनाकडून संकेत देण्यात आले आहे.

४५४ कोटींची थकबाकी
नागपूर शहरात ६ लाख १३ हजार मालमत्ता आहेत. यातील ५ लाख ५० हजार मालमत्ताधारकांना डिमांड वाटप केले आहे. चार लाख ४३ हजार १४६ मालमत्ताधारकांकडे ५१४ कोटींची थकबाकी होती. यातील १ लाख १० हजार मालमत्ताधारकांनी ६० कोटींची थकबाकी भरली आहे. तीन लाख ३३ हजार ८७ मालमत्ताधारकांकडे ४५४ कोटींची थकबाकी कायम आहे.

Web Title: No penalty waiver for dues: NMC strikes for water levy and property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.