कारवाईची गरज नाही, अपेक्षित सुधारणा करू
By Admin | Updated: June 2, 2017 02:32 IST2017-06-02T02:32:58+5:302017-06-02T02:32:58+5:30
जिल्हा परिषदेच्या लेटलतीफ कारभाराची पोलखोल जनमंच या सामाजिक संस्थेने बुधवारी केली होती. जनमंचचे

कारवाईची गरज नाही, अपेक्षित सुधारणा करू
सीईओ कादंबरी बलकवडे यांचे ‘जनमंच’च्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या लेटलतीफ कारभाराची पोलखोल जनमंच या सामाजिक संस्थेने बुधवारी केली होती. जनमंचचे पदाधिकारी सकाळी जिल्हा परिषदेत पोहोचले तेव्हा विविध विभागात कर्मचारी पोहोचलेच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच विविध विभागाचे प्रमुखसुद्धा कार्यालयीन वेळेत आपल्या कार्यालयात उपस्थित नव्हते. यासंदर्भात जि.प.च्या सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, जनमंचचे पदाधिकारी ज्या वेळेत जिल्हा परिषदेत पोहोचले, त्यावेळी जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे बहुतांश कर्मचारी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे रेकॉर्ड मी विभागप्रमुखांकडून मागवून घेतले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला भेटी देऊन काही सूचना केल्या आहेत. त्यात आम्ही नक्कीच सुधारणा करू. बायोमेट्रिक प्रणाली लवकरच सर्व विभागात लावण्यात येईल. परंतु कर्मचाऱ्यांवर कारवाईची गरज वाटत नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापासून ते सर्व विभागप्रमुख आपापल्या कक्षात उपस्थित नव्हते, यावर त्यांनी आक्षेप घेतला. तीन विभागप्रमुख अधिकृतरीत्या सुटीवर आहेत तर दोन विभागप्रमुख कामानिमित्त मुंबईला गेले होते. मी सुद्धा मुंबईला होते. काही विभागप्रमुख कार्यक्रमात असतील. आम्ही स्वत:च कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयीन वेळात उपस्थित राहावे, यासाठी दक्ष आहोत.