खून नव्हे सदोष मनुष्यवध हायकोर्ट

By Admin | Updated: May 15, 2014 02:21 IST2014-05-15T02:21:00+5:302014-05-15T02:21:00+5:30

यशोदरानगर येथील एका खूनप्रकरणी आरोपीला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप उच्च

No murder, manslaughter, High Court | खून नव्हे सदोष मनुष्यवध हायकोर्ट

खून नव्हे सदोष मनुष्यवध हायकोर्ट

जन्मठेप सात वर्षांच्या कैदेत परिवर्तित

नागपूर :

यशोदरानगर येथील एका खूनप्रकरणी आरोपीला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी आणि न्या. चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठाने सात वर्षांच्या सश्रम कारावासात परिवर्तित करीत हा खून नव्हे तर सदोष मनुष्यवध आहे, असा निर्वाळा दिला. पीर मोहम्मद ऊर्फ मुन्ना सिद्दीकी (३०) रा. यशोदरानगर, असे आरोपीचे नाव आहे. चंद्रशेखर पचखंडे, असे मृताचे नाव होते. या प्रकरणाची हकीकत अशी की, २५ मार्च २०१० रोजी यशोदरानगर भागातील मस्जिदनजीकच्या पानठेल्यावर मुन्ना आणि चंद्रशेखर यांच्यात भांडण झाले होते. लोकांनी त्यांचे भांडण सोडवले होते. परस्परात समझोता होऊन चंद्रशेखर हा आपल्या घरी गेला होता. त्यानंतर थोड्या वेळातच मुन्ना हा दुर्गामाता मंदिराजवळ आपल्या दोन्ही हातात चाकू घेऊन आला होता.

त्याने चंद्रशेखरला खाली पाडले होते. त्याच्या उरावर बसून त्याने त्याच्या डाव्या मांडीवर वार केले होते. लागलीच चंद्रशेखरची पत्नी घटनास्थळी धावली होती. पतीला वाचविण्याच्या हेतूने तिने मुन्नाचा हात पकडला होता. त्यावेळी तो तिला म्हणाला होता, ‘मेरा हाथ छोड, नही तो तुझे भी मार दुंगा’. मार मुझे, असे म्हणताच तो म्हणाला की, ‘मै औरत पे हाथ नही उठाता’. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला होता. चंद्रशेखरला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डब्ल्यू. हूड यांच्या न्यायालयात खटला चालून ३० डिसेंबर २०१० रोजी न्यायालयाने आरोपी मुन्नाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आव्हान म्हणून आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

आरोपीने मृताच्या कोणत्याही नाजूक अंगावर वार केला नाही. केवळ मांडीवर वार केला. त्यामुळे हे प्रकरण खुनाचे नसून सदोष मनुष्यवधाचे आहे, असा निर्वाळा देत न्यायालयाने जन्मठेप रद्द करून आरोपीला भादंविच्या ३०४ (भाग २) मध्ये दोषी ठरवले आणि ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयात आरोपीच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा तर सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील संगीता जाचक यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)

Web Title: No murder, manslaughter, High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.