यंदाची होळी पाण्याविनाच
By Admin | Updated: March 4, 2015 02:30 IST2015-03-04T02:30:21+5:302015-03-04T02:30:21+5:30
पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा फुटल्याने व अद्याप दुरुस्ती न झाल्याने गोरेवाडा तलावातील पा

यंदाची होळी पाण्याविनाच
अर्ध्या नागपूरला दिवसाआड पाणीपुरवठा : पश्चिम, दक्षिण व मध्य भागाचा समावेश
नागपूर : पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा फुटल्याने व अद्याप दुरुस्ती न झाल्याने गोरेवाडा तलावातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे नागपूर शहरातील पश्चिम, दक्षिण व मध्य भागाला ४ ते १० मार्चदरम्यान दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. ऐन होळीच्या दिवसात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
२५ फे ब्रुवारीला उजवा कालवा फुटला होता. मागील काही वर्षांत प्रथमच १०० फूट कालवा फुटला. त्यामुळे प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने गोरेवाडा तलावातील पाण्याची पातळी सतत घटत आहे. याचा जलशुद्धीकरण प्रकल्पावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शहराला पुरवठा होणाऱ्या ७० टक्के शुद्ध पाणी पुरवठ्यात घट होत आहे.
गोरेवाडा जलाशयातून शहराला ६५ टक्के पाणी पुरवले जाते. पाटबंधारे विभागाच्या पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा नादुरुस्त झाला आहे. हा कालवा वारंवार फु टत असल्याने तलावाच्या पाणी पातळीवर परिणाम होत आहे. त्यामुळे पाणी पातळी ३१५.०८ वरून ३१३.९० मीटरवर आली आहे. सध्या तलावाची पातळी ३१३.४७ इतकी आहे. पातळीत सतत घट होत असल्याने अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे ४ ते १० मार्चदरम्यान या भागात मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन ओसीडब्ल्यूने केले आहे. (प्रतिनिधी)