जल्लाद नाहीच!
By Admin | Updated: July 17, 2015 03:00 IST2015-07-17T03:00:52+5:302015-07-17T03:00:52+5:30
लालबुंद डोळे, अगडबंब शरीर आणि जाडजूड पीळदार मिशा. उघडेबंब सुटलेले पोट, बेंबीच्या खाली काळे धोतरासारखे कापड गुंडाळलेला, ...

जल्लाद नाहीच!
बोलवायचा कुठून : मीरा बोरवणकरांचा प्रश्न
नरेश डोंगरे नागपूर
लालबुंद डोळे, अगडबंब शरीर आणि जाडजूड पीळदार मिशा. उघडेबंब सुटलेले पोट, बेंबीच्या खाली काळे धोतरासारखे कापड गुंडाळलेला, तोच काळा कपडा डोक्यावर (रेल्वे इंजिनच्या) बांधलेला आणि कपाळावर काळा लंबा टिका लावलेला माणूस म्हणजे जल्लाद! सिनेमात फाशी देणारा हा व्यक्ती म्हणजे साक्षात यमदूतच. मात्र, राज्यात कुठेच कोणता ‘जल्लाद’ अस्तित्वात नाही. त्यामुळे याकूब मेमनला फाशी देण्यासाठी त्याला बोलविण्याचे कारणच नाही, अशी स्पष्टोक्ती राज्याच्या कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी लोकमतशी बोलताना केली.
मुंबईतील भीषण बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब अब्दुल रज्जाक मेमन याचा डेथ वॉरंट जारी झाला असून, ३० जुलैला त्याला फासावर लटकवले जाऊ शकते. राज्यात पुण्याच्या येरवडा आणि नागपुरातील मध्यवर्ती कारागृह अशा दोन कारागृहात फाशी देण्याची सोय आहे. याकूब गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरातील कारागृहात आहे. त्यात ३१ मार्चला नागपूर कारागृहात घडलेल्या जेल ब्रेकमुळे या कारागृहाची प्रतिमा पुरती मलीन झाली आहे. ती सुधारण्यासाठी आणि कैद्यांसोबतच कुरापतखोर पाकिस्तानलाही ‘चमकविण्यासाठी’ (नागपूर हे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर आहे!) याकूबला नागपुरातच फाशी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. तशा तयारीला लागण्याचे आदेशही कारागृह प्रशासनाला मिळाले आहे.
त्यामुळे एरवी स्मशानशांतता असणाऱ्या मध्यवर्ती कारागृहातील फाशी यार्डात गेल्या काही तासांपासून लगबग वाढली आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चाही सुरू झाल्या असून, उलटसुलट बातम्याही येत आहेत.
याकूबला फासावर लटकविण्यासाठी कोणता जल्लाद बोलविला जाणार, कुठून येणार, काय नाव असेल, तो कधी नागपुरात पोहचणार, असे प्रश्नही विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या कारागृह महानिरीक्षक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘जल्लाद नाहीच तर बोलवायचा कुठून’,असा मिश्किल प्रश्न केला.
हे तर कल्पनाचित्र!
जल्लाद नाहीच!
नागपूर : सिनेमावाले आणि त्यांच्यानंतर रंजक बातम्या पेरणाऱ्यांनी उभे केलेले कल्पनाचित्र म्हणजे ‘जल्लाद’ होय. वधस्तंभावर (फाशी यार्ड) पाठीमागे हात बांधून आणलेल्या आरोपीच्या तोंडावर तो बुरखा घालतो अन् त्याच्या गळ्याभोवती जाडजूड फास टाकतो; नंतर अधिकाऱ्यांनी संकेत देताच हा ‘जल्लाद’ कैद्याच्या पायाखालची लाकडी फळी खटक्याने ओढतो. हे सिनेमापुरतेच आहे. प्रत्यक्षात तसा पेहराव केलेला कोणताही व्यक्ती फाशी देत नाही.
बोरवणकर म्हणाल्या, आरोपीला फाशी देणारा राज्यात कुठेच, कोणता ‘जल्लाद’ अस्तित्वात नाही. कारागृहाच्या नामावलीत तसे कोणतेही पद नाही. त्यामुळे नागपुरात काय अन् येरवड्यात काय,‘अलीकडे‘ कोणत्याच आरोपीला फाशी देण्यासाठी कुठला जल्लाद येण्याचे अथवा बोलवण्याचे कारण नाही. याकूबला फाशी कुठे देणार, या प्रश्नावर त्यांनी बोलण्याचे टाळले. आपल्याकडे अधिकृत असे काहीही बोलण्यासारखे नाही. अद्याप तसे आदेश आपल्याला मिळाले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसच जल्लाद
जाणकार सूत्रांच्या माहितीनुसार, बिहार आणि उत्तर प्रदेशातील विविध कारागृहांत इंग्रज राजवटीत एक व्यक्ती अनेकांना फासावर लटकविण्यासाठी जात होता. त्यामुळे तो जल्लाद म्हणून ओळखला जायचा. पाच रुपयांपासून फाशी देण्याचे मानधन घेणाऱ्या या व्यक्तीने शेवटच्या फाशीचे मानधन तीन हजार रुपये घेतले होते; नंतर तो लखनौमध्ये स्थायिक झाला. रंगा बिल्ला यांना मम्मूआ नामक जल्लादाने फाशी दिली होती. त्यावेळी त्याने १८०० रुपये मानधन घेतले होते. अफजल गुरू आणि नंतर कसाबच्या वेळीसुद्धा मम्मुआचे नाव चर्चेला आले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, आता असा कोणताही जल्लाद अस्तित्वात नाही. क्रूरकर्म्यांना फासावर लटकविण्यासाठी पोलिसच जल्लादची भूमिका वठवितात.