कोळसा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक नाही : प्रल्हाद जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 23:30 IST2019-09-27T23:28:15+5:302019-09-27T23:30:31+5:30
देशात कोळसा उत्पादन वाढविण्यासोबतच गुणवत्ता कायम राखण्याचे सरकारचे ध्येय आहे. कोळसा क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय कोळसा, खाण व संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले.

कोळसा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक नाही : प्रल्हाद जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात कोळसा उत्पादन वाढविण्यासोबतच गुणवत्ता कायम राखण्याचे सरकारचे ध्येय आहे. कोळसा क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय कोळसा, खाण व संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. शुक्रवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित डॉ.हेडगेवार स्मृति भवन परिसराला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जोशी सकाळच्या सुमारास रेशीमबागेत पोहोचले. यावेळी त्यांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हेदेखील होते. कोळसा कामगारांनी विदेशी गुंतवणुकीच्या विरोधात केलेल्या आंदोलनाबाबत जोशी यांनी भाष्य केले. कोल इंडिया लि. तसेच सिंगारेनी कोलरीज कंपनीला केवळ अतिरिक्त उत्पादनाची जबाबदारी देण्यात आली आहे. विदेशी गुंतवणुकीचा प्रश्नच येत नाही. २०२३-२४ मध्ये या दोन्ही कंपन्यांनी १,१२३ मिलीयन टन कोळशाचे उत्पादन करावे, अशी सरकारची इच्छा आहे. कारण तेव्हा कोळशाची कमतरता भासू शकते. २०१८-१९ मध्ये देशात कोळशाची आयात करावी लागली होती. कामगार संघटनांसोबत सरकार चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.