वाहनांना नो एन्ट्री

By Admin | Updated: July 22, 2014 00:58 IST2014-07-22T00:58:47+5:302014-07-22T00:58:47+5:30

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कस्तुरचंद पार्कची तेथे येणाऱ्या वाहनांमुळे दुरवस्था होत असल्याने पार्कच्या तीनही मोठ्या प्रवेशद्वाराला तत्काळ कुलूप लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा

No entry for vehicles | वाहनांना नो एन्ट्री

वाहनांना नो एन्ट्री

कस्तुरचंद पार्कच्या प्रवेशद्वारांना लागणार कुलूप : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नागपूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कस्तुरचंद पार्कची तेथे येणाऱ्या वाहनांमुळे दुरवस्था होत असल्याने पार्कच्या तीनही मोठ्या प्रवेशद्वाराला तत्काळ कुलूप लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी सोमवारी दिले. मैदानाच्या इतर सोयीसुविधांबाबत आणि तेथे होत असलेली अवैध कामे थांबविण्याबाबत लवकरच पोलीस, महसूल, महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त बैठक बोलविण्याचे निर्देशही कृष्णा यांनी सर्व संबंधितांना दिले. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कस्तुरचंद पार्क चा वापर विविध व्यावसायिक कार्यक्रमांसाठी केला जातो. तेथे वाहने उभी केली जातात.
अलीकडच्या काळात तर येथून प्रवासी वाहने सुटत असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी येथे अवैध व्यवसाय केले जातात. त्याचा परिसरातील नागरिकांनाही फटका बसतो. सकाळी येथे फिरायला जाणारे नागरिकही त्यामुळे त्रस्त आहेत.
या सर्व प्रश्नांकडे गतवर्षी ‘परिवर्तन द सिटीझन्स फोरम’ने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आमदार सुधाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १७ एप्रिल २०१३ रोजी एक शिष्टमंडळ तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना भेटले होते. त्यांनी मैदानाचा व्यावसायिक वापर थांबविणे, मैदानाची स्वच्छता करणे, देखरेखीसाठी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करणे, सकाळी फिरण्यासाठी ‘वॉकिंग ट्रॅक’ तयार करणे, अवैध व्यवसाय थांबविण्यासाठी पोलीस सुरक्षा वाढविणे आदी आश्वासने दिली होती.
‘परिवर्तन द सिटीझन्स फोरम’ने वेधले लक्ष
‘परिवर्तन द सिटीझन्स फोरम’ने सोमवारी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली व त्यांना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कस्तुरचंद पार्कबाबत दिलेल्या आश्वासनांची माहिती दिली. तसेच मैदानाची वाहनांमुळे होत असलेली दुर्दशा थांबविण्याची विनंती केली. यावर कृष्णा यांनी मैदानाच्या तीनही मोठ्या प्रवेशद्वाराला तत्काळ कुलूप लावण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी (महसूल) संगीतराव यांना दिले. इतर सोयीसुविधा आणि उपाययोजनांबाबत माहिती घेऊन पावले उचलण्याचे तसेच मैदानाचा व्यावसायिक वापर कमी करण्यासाठी सुरक्षा ठेव रक्कम वाढविण्याचे संकेतही त्यांनी दिले. यावेळी मैदानावर नागरिकांसाठी ‘वॉकिंग ट्रॅक’ बांधण्याची विनंती नगरसेवक देवा उसरे यांनी केली व यासाठी महापालिकेचा निधी देण्याची तयारी दर्शविली.
शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण अंगलवार, सचिव दिनेश नायडू, नगरसेवक देवा उसरे, परिणय फुके, त्रिशरण सहारे, राजेश पिल्ले, सागर यंगलवार यांच्यासह संस्थेचे इतरही पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: No entry for vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.