शिक्षण नाही, शाळा महत्त्वाची
By Admin | Updated: May 18, 2016 03:21 IST2016-05-18T03:21:08+5:302016-05-18T03:21:08+5:30
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्याची(आरटीई)अंमलबजावणी केली.

शिक्षण नाही, शाळा महत्त्वाची
आरटीईची सोडत : ५९५ शाळांसाठी १३,६४० अर्ज
नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्याची(आरटीई)अंमलबजावणी केली. परंतु त्याचे विपरीत परिणाम दिसायला लागले आहे. अनेक मध्यमवर्गीय आरटीईच्या प्रक्रियेत सहभागी होऊन लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. या पालकांनी शिक्षणापेक्षा काही नामांकित शाळांनाच महत्त्व दिले आहे. काहीच शाळांना पालकांनी पसंती दर्शविली आहे. एका-एका शाळेसाठी हजारो अर्ज आले आहेत. आरटीईच्या लॉटरीची सोडत मंगळवारी बी.आर.ए. मुंडले शाळेत पार पडली. यात पालकांनी शिक्षणाला नाही, शाळेला महत्त्व दिल्याचे उघडकीस आले.
नागपूर जिल्ह्यातील ५९५ शाळांतील ७,४१० जागेसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत १३,६४० पालकांनी आॅनलाईन अर्ज केले. मंगळवारी आरटीईची लॉटरी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या हस्ते काढण्यात आली. याप्रसंगी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, शिक्षण अधिकारी (प्रा.) दीपेंद्र लोखंडे, उपशिक्षण अधिकारी अनिल कोल्हे, आरटीई अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहीद शरीफ, अर्चना भोयर आदी उपस्थित होते.
सोडतीत शून्य ते नऊ अंक चिमुकल्यांद्वारे निवडण्यात आले. असे ४० अंक निवडण्यात आले. प्रथम अंक नागो गाणार यांनी काढला. पुढची प्रक्रिया राष्ट्रीय सूचना केंद्र पुणे यांच्यामार्फत शाळानिहाय विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया केली जाणार आहे. (प्रतिनिधी)