एनआयटीच्या लाचखोर अभियंत्याला अटक
By Admin | Updated: May 7, 2015 02:13 IST2015-05-07T02:13:34+5:302015-05-07T02:13:34+5:30
जुने बांधकाम तोडण्याची परवानगी देण्यासाठी ३५ हजाराची लाच मागणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यासच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

एनआयटीच्या लाचखोर अभियंत्याला अटक
नागपूर : जुने बांधकाम तोडण्याची परवानगी देण्यासाठी ३५ हजाराची लाच मागणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यासच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लाचखोर अभियंत्याचे नाव चंद्रकांत धरमदास नगराळे (४८) आहे. हनुमाननगर कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
तक्रारकर्ता गणपत बाराहाते यांच्या पत्नीच्या नावाने बिडीपेठ येथे प्लॉट आहे. या प्लॉटवर दोन रुमचे बांधकाम आहे. बाराहाते यांनी २००५ मध्ये प्लॉटच्या ‘आरएल’साठी व बांधकामाच्या नियमितीकरणासाठी हनुमाननगर झोन कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी कार्यालयातून जुने बांधकाम तोडल्यानंतरच नियमितीकरण होऊ शकते, अशी माहिती दिली. जुने बांधकाम अतिक्रमण असल्यामुळे ते तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेण्यास सांगितले. बाराहाते यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये हुडकेश्वर पोलीस ठाण्यात बंदोबस्तासाठी अर्ज केला. बंदोबस्त शुल्कापोटी १५ हजार रुपये भरले. पोलीस पोहोचल्यानंतर एनआयटीच्या तोडूदस्त्याने येण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांचे १५ हजार रुपये बुडाले. त्यानंतर एनआयटीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून पुन्हा बंदोबस्तासाठी अर्ज केला. पैसे भरले, मात्र तोडूदस्ता आला नाही. २८ एप्रिलला बाराहाते यांनी हनुमाननगर झोनच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक चंद्रकांत नगराळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे नव्याने अर्ज केला. दुसऱ्याच दिवशी नगराळे याने बाराहाते याला चर्चेसाठी बोलाविले. काम करून देण्यासाठी ३५ हजार मागितले. बाराहाते यांनी त्याला २० हजार दिले; उरलेली रक्कम चार-पाच दिवसात देण्याचे सांगितले.
बाराहाते यांनी एनआयटी अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीनुसार बुधवारी बाराहाते हे नगराळे याच्याकडे गेले. नगराळे याने पैसे दिल्यानंतरच काम होईल, असे त्यांना सांगितले. दुपारी २ वाजता एसीबीचे निरीक्षक डब्ल्यू.एम. डाबरे आपल्या पथकासह एनआयटी कार्यालयात पोहोचले. नगराळेला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. यानंतर त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली, मात्र तिथे काही विशेष मिळाले नाही. (प्रतिनिधी)