दीक्षाभूमीसाठी नऊ कोटी रुपये मंजूर
By Admin | Updated: January 22, 2016 03:43 IST2016-01-22T03:43:08+5:302016-01-22T03:43:08+5:30
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर फौंडेशन या स्वायत्त मंडळाने नागपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासाकरिता महाराष्ट्र सरकारला नऊ कोटी रुपये मंजूर केले

दीक्षाभूमीसाठी नऊ कोटी रुपये मंजूर
नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर फौंडेशन या स्वायत्त मंडळाने नागपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासाकरिता महाराष्ट्र सरकारला नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.
केंद्र सरकार डॉ. आंबेडकरांची १२५ वे जयंती वर्ष साजरे करीत आहे. ‘डॉ. आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या अनुयायांसमवेत धर्मांतर केलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी येणाऱ्या ९,४१,३९,२७६ रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. दीक्षाभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती समारोहाच्या संदर्भात होणाऱ्या विकास कामासाठी मंजूर रकमेच्या ५० टक्के म्हणजे ४,७०,६९,६३८ रुपये नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना जारी करण्यात आली आहे, तर उर्वरित रक्कम विकास कामातील प्रगतीच्या आधारावर जारी केली जाईल,’ असे एका सरकारी आदेशात म्हटले आहे.
दीक्षाभूमीला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीसाठी मास्टर प्लान तयार करण्याचे नागपूर सुधार प्रन्यासला सांगितले आहे.