रामटेक तालुक्यात एका जागेसाठी नऊ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST2021-07-07T04:10:01+5:302021-07-07T04:10:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : जिल्हा परिषद, पंचायत समिती पाेटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी रामटेक तालुक्यात जिल्हा ...

रामटेक तालुक्यात एका जागेसाठी नऊ उमेदवार रिंगणात
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : जिल्हा परिषद, पंचायत समिती पाेटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी रामटेक तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एका जागेसाठी नऊ जण रिंगणात असून, पंचायत समितीच्या तीन जागांसाठी १६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ही पाेटनिवडणूक उमरी-बाेथिया पालाेरा जिल्हा परिषद सर्कल तर नगरधन, मनसर व उमरी पंचायत समिती गणांसाठी घेतली जात आहे.
उमरी-बाेथिया पालाेरा जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे कैलास राऊत, शिवसेनेचे देवानंद वंजारी, भाजपचे लक्ष्मण केणे, राष्ट्रवादीचे काशिराम बरबटे, गाेंगपा-प्रहार आघाडीचे हरिचंद उईके, वंचित बहुजन आघाडीचे नम्रसेन डाेंगरे यांच्यासह सुशील उईके, महादेव वरठी, श्रावण बाेरकर या तीन अपक्ष उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.
नगरधन पंचायत समिती गण महिलांसाठी राखीव करण्यात आल्याने या गणातून काँग्रेसच्या अश्विता बिरणवार, प्रहार आघाडीच्या शाेभा सराेदे, शिवसेनेच्या मालती बावनकुळे, भाजपच्या कविता बावनकुळे, अपक्ष कांचनमाला नरेंद्र बंधाटे, अपक्ष स्वाती रामेलवार (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमरी पंचायत समिती गणातून गाेंगपा-प्रहार आघाडीचे रामकृष्ण वरखडे, शिवसेनेचे रमेश ब्रह्मनाटे, काँग्रेसचे महेशकुमार मडावी, भाजपचे सुखदेव शेंद्रे, राष्ट्रवादीचे संदीप ईनवाते, अपक्ष भूमेश्वरी कुंभलकर यांनी नामांकन अर्ज भरले. मनसर पंचायत समिती गणातून तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात काँग्रेसच्या कला ठाकरे, भाजपच्या अर्चना पेटकर व शिवसेनेच्या स्वरूपा चाैधरी यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी रामटेक तहसील कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केली हाेती. काँग्रेसचे कैलास राऊत यांनी गाेंडी नृत्य करीत रॅली काढली हाेती. या रॅलीत जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे सहभागी झाल्या हाेत्या. काेराेनाकाळातील या प्रकारामुळे अनेकांना नवल वाटले. पाेलीस बंदाेबस्त असतानाही कार्यकर्त्यांची गर्दी व हाैसमाैज कायम हाेती.
...
पक्षांतर व अपक्ष उमेदवारी
उमरी-बाेथिया पालाेरा जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपने त्यांचा उमेदवार बदलविला आहे. मागच्यावेळी वसंता काेकाटे उभे हाेते तर यावेळी भाजपने लक्ष्मण केणे यांना उमेदवारी दिली. अर्चना पेटकर यांनी यावेळी मनसर पंचायत समिती गणातून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला. मागची निवडणुकीत त्यांनी याच गणातून शिवसेनेच्या तिकिटावर लढविली हाेती. त्यावेळी त्यांना काँग्रेसच्या कला ठाकरे यांनी पराभूत केले हाेते. नगरधन गणातून भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे यांच्या पत्नी कांचनमाला यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भूमेश्वरी कुंभलकर यांनी मागची निवडणूक उमरी पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या तिकिटावर लढविली हाेती. यावेळी त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली. त्या यावेळी रिंगणात असून, भाजपने एबी फाॅर्म सुखदेव शेंद्रे यांना दिला आहे.