कुख्यात अवतारेसह नऊ आरोपी निर्दोष

By Admin | Updated: November 10, 2014 00:58 IST2014-11-10T00:58:07+5:302014-11-10T00:58:07+5:30

भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आणि उमरेड मार्गावरील बहादुरा ग्रामपंचायतीचा सदस्य आकाश पंचभाई याच्या निर्घृण खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या

Nine accused innocent | कुख्यात अवतारेसह नऊ आरोपी निर्दोष

कुख्यात अवतारेसह नऊ आरोपी निर्दोष

बहादुरा ग्रा. पं. सदस्याचे खूनप्रकरण: मृताचे भाऊही झाले होते ‘होस्टाईल’
नागपूर : भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आणि उमरेड मार्गावरील बहादुरा ग्रामपंचायतीचा सदस्य आकाश पंचभाई याच्या निर्घृण खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने कुख्यात गुन्हेगार संजय अवतारे याच्यासह सर्व नऊ आरोपींची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली.
उल्लेखनीय म्हणजे या खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान मृताचे दोन्ही भाऊ आपली साक्ष देताना फितूर झाले होते.
खुनाची ही घटना २७ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेलिफोननगर येथे घडली होती.
अन्य आरोपींमध्ये जगपालसिंग यादव, पप्पू शाहू, अरविंद ऊर्फ भुऱ्या घोटेकर, महेंद्र मोहाडीकर, राजू ऊर्फ राजा पानतावणे, दामू राऊत, संजय शाहू आणि बादल वाघमारे यांचा समावेश आहे.
सरकारी पक्षानुसार खुनाच्या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी २४ सप्टेंबर रोजी उमरेड मार्गावरील ताराम लॉन या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आकाश , त्याचे दोन भाऊ तसेच कुख्यात संजय अवतारे आणि साथीदार सहभागी झाले होते. या समारंभात पंचभाईसोबत संजय अवतारे याचे भांडण झाले होते. तेव्हा अवतारे हा तलवार घेऊन आकाशच्या मागे धावला होता. सहा महिन्यापूर्वीही आकाशचे पाण्याच्या टँकरवरून जगपालसिंग याच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. त्यामुळे या सर्वांनी आकाशचा काटा काढण्याचे ठरवले होते.
आकाश पंचभाई हा सुद्धा एका खुनाचा आरोपी होता. राजकारणात सक्रिय झाल्याने त्याने गुन्हेगारी सोडली होती.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यापासून त्याचे वर्चस्व वाढले होते. परंतु ते संजय अवतारे याला खुपत होते.
घटनेच्या दिवशी आकाशचा भाऊ प्रदीप धनराज पंचभाई हा घरी गणपतीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम असल्याने भाजीपाला विकत घेण्यासाठी कॉटन मार्केट येथे जाण्यासाठी निघाला होता. त्याला टेलिफोननगर येथील बाळू पान पॅलेससमोर संजय अवतारे आणि साथीदार हातात तलवारी व इतर साहित्य घेऊन दिसले. ते लोकांच्या दिशेने तलवारी झळकवत होते. घटनास्थळावर एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसताच प्रदीपने जवळ जाऊन पाहिले असता तो त्याचा भाऊ आकाश असल्याचे त्याला समजले होते.
प्रदीपच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी खून व दंग्याचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विजय आकोत यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षाने एकूण ११ साक्षीदार तपासले होते. मृत आकाशचे दोन्ही भाऊ, अन्य साक्षीदार आणि एकमात्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंकज ठाकरे हा फितूर झाला होता. त्यामुळे सबळ पुराव्याच्या अभावी न्यायालयाने सर्व नऊ आरोपींची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपींच्यावतीने अ‍ॅड. अविनाश गुप्ता, अ‍ॅड. अमित बंड, तर सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)

Web Title: Nine accused innocent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.