मनपा डिम्टसवर मेहरबान का?

By Admin | Updated: April 19, 2017 02:35 IST2017-04-19T02:35:22+5:302017-04-19T02:35:22+5:30

दिल्ली मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम (डिम्टस) या शहर बस सेवा चालविणाऱ्या कंपनीला कंत्राटदारांना तिकीट मशीन्स व कंडक्टर्स पुरविणे बंधनकारक आहे.

Nimda Dementaswar? | मनपा डिम्टसवर मेहरबान का?

मनपा डिम्टसवर मेहरबान का?

कंडक्टर्स पुरविले नाही तरी कारवाई नाही!
सोपान पांढरीपांडे नागपूर
दिल्ली मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम (डिम्टस) या शहर बस सेवा चालविणाऱ्या कंपनीला कंत्राटदारांना तिकीट मशीन्स व कंडक्टर्स पुरविणे बंधनकारक आहे. पण डिम्टस वारंवार आपली जबाबदारी झटकत आहे. परंतु मनपाने आजवर कुठलीही कारवाई या कंपनीवर केली नाही. डिम्टसवर ही मेहरबानी का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे.

करार काय म्हणतो?
मनपा व डिम्टसमधील करारानुसार डिम्टसने जर कंडक्टर उपलब्ध केला नाही तर प्रति कंडक्टर प्रति दिवस ५०० रुपये दंड मनपा करू शकते. असाच ५०० रु. दंड प्रति तिकीट मशीन प्रति दिवस आकारण्याचीही अट करारात आहे.
एवढी स्पष्ट अट करारात असतानासुद्धा डिम्टस कंडक्टर्स व तिकीट मशीन्स पुरवत नाही. परिणामी कंत्राटदारांच्या बसेस जागेवर उभ्या आहेत.
अनेक रुटवर बसेस धावत नाहीत याशिवाय डिम्टस कंडक्टरांना धड पगारसुद्धा देत नाही. गेल्या महिन्यात याच मुद्यावर कंडक्टरांनी संप केला व नागपूरची सिटी बस सेवा दोन दिवस बंद होती. शेवटी कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीने संप संपला पण अजूनही बस सेवा सुरळीत झालेली नाही.
याबाबतीत डिम्टसचे सीईओ अमित हितकारी यांना संपर्क केला असता आम्ही क्रमश: बस सेवेचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सर्व बसेस एकाच दिवसात धावणे शक्य नाही. पुढील सहा महिन्यांत सर्व बसेस धावू लागतील व सर्व काही सुरळीत होईल, असे हितकारी म्हणाले. परंतु सर्व बसेस एकदम चालवायच्या नव्हत्या तर कंत्राटदारांना बसेस उपलब्ध करण्याची सक्ती का केली?गुंतवणुकीवरील व्याजाचे काय? या प्रश्नांवर हितकारी निरुत्तर झाले.

मनपा काय म्हणते?
करारात दंड करण्याची सोय असतानाही मनपा डिम्टसकडून दंड का वसूल करत नाही? या प्रश्नावर मनपाचे परिवहन व्यवस्थापक शिवाजीराव जगताप म्हणाले आता फक्त ३०-३५ दिवसच बस सेवा सुरू होऊन झाले आहेत. त्यामुळे डिम्टसला अधिक वेळ द्यायला हवा.
परंतु दंड वसूल करण्याचे सोडा मनपाने दंडाची साधी नोटीस तरी डिम्टसला का दिली नाही या प्रश्नाचे उत्तर जगताप यांचेकडे नव्हते.
चर्चेदरम्यान नागपुरात मुंबई, पुणे, ठाणे या शहरांसारखी सक्षम बस सेवा द्यायची असेल तर एकूण १२०० बसेस लागतील असेही जगताप म्हणाले. परंतु ३०० बसेस पैकी ९५ बसेस उभ्या राहात असतील तर मनपाचे प्रशासन १२०० बसेस समर्थपणे कशा चालवू शकेल असाही प्रश्न उभा रहातो.
त्यामुळे मनपा आता तरी डिम्टसवर कारवाई करून उभ्या असलेल्या ९५ बसेस चालत्या करून जनतेला दिलासा देणार का? हा खरा प्रश्न आहे.

Web Title: Nimda Dementaswar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.