रात्रशाळेत ‘लक्ष्मी’ची सोनपावलं!
By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:01+5:302016-06-07T07:42:01+5:30
सातत्याचा आजार आणि पुढे संसाराच्या गाड्यात शिक्षण राहून गेले. लक्ष्मीला ते सातत्याने बोचत होते. वैदर्भीय महिला देशाची

रात्रशाळेत ‘लक्ष्मी’ची सोनपावलं!
२५ वर्षांनंतर ओलांडला दहावीचा उंबरठा
आनंद डेकाटे ल्ल नागपूर
सातत्याचा आजार आणि पुढे संसाराच्या गाड्यात शिक्षण राहून गेले. लक्ष्मीला ते सातत्याने बोचत होते. वैदर्भीय महिला देशाची राष्ट्रपती होऊ शकते, तर आपण दहावीही नाही, असा प्रश्न तिला सातत्याने पडत होता. तिने पण केला आणि दोन तपानंतर (२५ वर्षानंतर )लक्ष्मीने दहावीचा उंबरठा अखेर यशस्वीपणे ओलांडला. लक्ष्मी महेश बर्लेवार असे या माऊलीचे नाव ! त्या सिरसपेठ भागात राहतात. सिरसपेठ येथील नरेंद्र नाईट हायस्कूल रात्रशाळेत शिकून त्यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी दहावीची परीक्षा ६१ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होत एक आदर्श घालून दिला. त्यांना यासाठी त्यांच्या पतीने प्रोत्साहित केले, हे विशेष.
लक्ष्मी एका खासगी दवाखान्यात परिचारिकेचे शिक्षण घेत आहेत. लक्ष्मी बर्लेवार यांचे माहेरचे नाव रश्मी रमेश सुरवाडे आहे. लक्ष्मी यांच्या माहेरच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. घरी तीन बहिणी आणि एक भाऊ होता. आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही फारसे शिकू शकले नाही. आठव्या वर्गात असताना लक्ष्मी या खूप आजारी राहू लागल्या. त्या आजारातच त्यांनी नववीची परीक्षा दिली, परंतु त्यांचा एक विषय राहिला. आजारपण वाढत गेले आणि त्यांनी पुढे शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांचे महेश बर्लेवार यांच्याशी लग्न झाले. त्या संसारात रमल्या. लग्नाला १७ वर्षे झाली. यादरम्यान शिक्षण अर्धवट राहिल्याची सल त्यांना नेहमी बोचत होती.
इतरांसाठी प्रेरणा
नाईट स्कूलमध्ये सहसा नोकरी करणारी मंडळीच प्रवेश घेतात. त्यांच्यात शिकण्याची जिद्द असते. परंतु लक्ष्मी बर्लेवार यांनी २५ वर्षानंतर दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून इतरांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. आता महिलाही अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास आहे.
- राजेंद्र झाडे
मुख्याध्यापक, नरेंद्र नाईट हायस्कूल, सिरसपेठ