विमानतळावर नायजेरियन तरुणाला पकडले
By Admin | Updated: September 27, 2016 03:32 IST2016-09-27T03:32:56+5:302016-09-27T03:32:56+5:30
वर्षभरापासून भारतात अवैध वास्तव्य करणारा एका नायजेरियन तरुण स्थानिक सीआयएसएफ तसेच

विमानतळावर नायजेरियन तरुणाला पकडले
पासपोर्ट बनावट, भारतात अवैध वास्तव्य : सीआयएसएफ, इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांची सतर्कता
नागपूर : वर्षभरापासून भारतात अवैध वास्तव्य करणारा एका नायजेरियन तरुण स्थानिक सीआयएसएफ तसेच इमिग्रेशन विभागातील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पकडला गेला. इरिक जॉन क्वेम असे त्याचे नाव आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सकाळी इरिक आला. त्याला गो एअरच्या विमानाने (जी-८/ १४१) मुंबईला जायचे होते. त्याने बोर्डिंग पासही मिळवला.
मात्र, त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने इमिग्रेशन विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याचा पासपोर्ट आणि व्हीसा तपासला.
पासपोर्ट नंबर सिस्टममध्ये टाकला तेव्हा तो दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा निघाला. त्यामुळे इरिकजवळचा पासपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले. त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. इरिक २०१५ मध्ये तीन महिन्याचा मेडिकल व्हीसा घेऊन भारतात आला होता. तीन महिन्यानंतर त्याने मायदेशी परत जायला पाहिजे होते.
मात्र, तो भारतात अवैध वास्तव्य करून विविध शहरात फिरत असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला सोनेगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले. (प्रतिनिधी)
त्यामुळे आला संशय!
इरिकजवळ मुंबईला जाण्याचे विमानाचे तिकीट २६ सप्टेंबरचे होते. मात्र, तो २५ सप्टेंबरलाच विमानतळावर पोहचला होता. सीआयएसएफच्या ज्या अधिकाऱ्याने आज त्याला पकडले, त्याच अधिकाऱ्याने इरिकला रविवारी सकाळी परत पाठविले होते. परंतु इरिकवर त्यांना त्याचवेळी संशय आला होता. प्रकरण विदेशी नागरिकांशी संबंधित असल्याने रविवारी त्यांनी संयम राखला. सोमवारी सकाळी तो विमानतळावर आल्यानंतर त्यांनी इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांना पासपोर्टची कसून चौकशी करायला लावली अन् इरिकची बनवाबनवी उघड झाली.
कशाला आला होता नागपुरात?
इरिक नागपुरात कशाला आला होता, ते स्पष्ट झाले नाही. देशभरातील विमानतळांसह नागपूर विमानतळालाही दहशतवादी संघटनांचा धोका असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी वेळोवेळी इशारे दिले आहेत. अशात इरिकच्या रुपात एक विदेशी नागरिक नागपूर, मुंबईतील विमानतळासह ठिकठिकाणच्या विमानतळावर वर्षभरापासून बिनधास्त फिरत असल्याने सुरक्षा आणि सतर्कतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. नागपूरच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे इरिक पकडला गेला. त्याचा नागपुरात येण्याचा उद्देश कोणता होता, ते स्पष्ट झाले नाही. यासंदर्भात पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्याशी चर्चा केली असता, दुभाषकाच्या माध्यमातून इरिकची कसून चौकशी केली जात असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.