अन्य रुग्णालयांमधील बालकांसाठीही आता नागपूरच्या ‘मेयो’त ‘एनआयसीयू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 10:41 IST2018-12-03T10:39:53+5:302018-12-03T10:41:55+5:30
मेयो प्रशासनाने ४० खाटांचे ‘एनआयसीयू’ तर १० खाटांचे ‘पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (पीआयसीयू) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अन्य रुग्णालयांमधील बालकांसाठीही आता नागपूरच्या ‘मेयो’त ‘एनआयसीयू’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या कुणाचे चिमुकले बाळ जीवन-मरणाशी संघर्ष करीत असेल आणि त्याला अद्यावत उपचारापासून वंचित ठेवले जात असेल तर त्या बाळाच्या पालकाची मनस्थिती कशी असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून पालकांची ही तळमळ मेयो रुग्णालय प्रशासनाला कळत असूनही काहीच करता येत नव्हते. कारण, इतर इस्पितळात जन्माला आलेल्या गंभीर बालकांना मेयोच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (निओनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट) ठेवले नव्हते. त्यांना सामान्य वॉर्डात ठेवले जायचे. यामुळे मृत्यूचा धोका असायचा. याची दखल घेत मेयो प्रशासनाने ४० खाटांचे ‘एनआयसीयू’ तर १० खाटांचे ‘पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (पीआयसीयू) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही विभाग लवकरच रुग्णांच्या सेवेत असेल.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या राज्यातून अतिजोखमीच्या माता प्रसूतीसाठी दाखल होत असतात. मेयोमध्ये दरवर्षी साधारणत: १० हजार नवजात बालकांचा जन्म होतो. यातील अतिजोखमीची १२०० वर बालरुग्ण दाखल करण्याची वेळ येते.
मात्र मेयोमध्ये केवळ सात खाटांचेच ‘एनआयसीयू’ आहे. यामुळे केवळ मेयोमध्येच जन्म घेणाऱ्या बालकांना या विभागात दाखल केले जाते. बाहेरुन येणारे रुग्ण कितीही गंभीर असले तरी त्यांना सामान्य वॉर्डात ठेवले जाते. येथे आवश्यक सोयी नसल्याने मृत्यूचा धोका नेहमी राहायचा. याची दखल बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सी.एम. बोकडे यांनी घेतली. ४० खाटांचे ‘एनआयसीयू’ व १० खाटांचे ‘पीआयसीयू’ सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनीही यात पुढाकार घेतला. त्यांनी जागा उपलब्ध करून देऊन, आवश्यक यंत्रसामुग्रीही उपलब्ध करून देणार आहे.
मेयोमधील ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’मध्ये ‘आर्थाेपेडीक’ वॉर्ड व शस्त्रक्रिया गृह स्थानांतरित झाल्याने ही जागा रिकामी झाली आहे. अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी रिकाम्या झालेल्या वॉर्ड क्रमांक १ मध्ये ४० खाटांचे ‘एनआयसीयू’ उभारण्याला मंजुरी दिली. यात २० खाटा बाहेरील बालकांसाठी तर २० खाटा रुग्णालयातील बालकांसाठी राखीव असणार आहे. तर आर्थाेपेडीक विभागाच्या रिकाम्या झालेल्या शस्त्रक्रिया गृहात १० खाटांचे ‘पीआयसीयू’ होणार आहे.
न्युओनेटल व्हेंटिलेटरने सज्ज असणार विभाग
प्राप्त माहितीनुसार, ‘एनआयसीयू’मध्ये न्युओनेटल व्हेंटिलेटर, बेडसाईड मॉनिटर्स, सीपीएपी, फोटोथेरपी युनिट यासारख्या अद्ययावत उपकरणांचा समावेश असणार आहे. यामुळे बालकांना अद्ययावत उपचार मिळतील.
प्रस्तावित विभाग लवकरच रुग्णसेवेत
मेयोमध्ये केवळ सात खाटांचेच ‘एनआयसीयू’ आहे. यामुळे हा विभाग नेहमीच रुग्णाने फुल्ल असतोे. बाहेरून आलेल्या बालकांसाठी ही सोय देणे अडचणीचे जात होते. याची दखल घेऊन ‘एनआयसीयू’ व ‘पीआयसीयू’चा प्रस्ताव तयार करण्यात आला. लवकरच हे दोन्ही विभाग रुग्णसेवेत असण्याची शक्यता आहे.
-डॉ. सी.एम. बोकडे, अधिष्ठाता, मेयो