नवीन पाणीपुरवठा योजना रखडली
By Admin | Updated: April 17, 2017 02:15 IST2017-04-17T02:15:42+5:302017-04-17T02:15:42+5:30
नरखेड तालुक्यातील बेलोना येथील नागरिकांना एप्र्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

नवीन पाणीपुरवठा योजना रखडली
बेलोन्यात पाणीसमस्या :
आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा
बेलोना : नरखेड तालुक्यातील बेलोना येथील नागरिकांना एप्र्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या योजनेचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. परिणामी, गावात आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
बेलोना येथे एकूण पाच वॉर्ड असून, लोकसंख्या सहा हजाराच्या आसपास आहे. पाणीटंचाई बेलोनावासीयांसाठी नवीन नाही. ही समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी वारंवार मागणी केल्याने, दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नवीन योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेंतर्गत करावयाच्या कामांसाठी ९५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली. या कामावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते दोन वर्षात पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे या नवीन योजनेचा नागरिकांना उपयोग होत नाही. गावात हॅण्डपंप, सार्वजिक विहिरी व खासगी विहिरी आहेत. परंतु वाढत्या तापमानामुळे गावातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी नळ योजनेवर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नाही. पाणीपुरवठ्याच्या विहिरीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावाला सध्या आठवड्यातून दोनदा १० ते १५ मिनिटे पाणीपुरवठा केला जातो. त्यातच गावातील काही नागरिक नळाला टिल्लूपंप लावत असल्याने, अर्ध्या गावातील नागरिकांना आठवड्यातून दोनदा गुंडभर पाणी मिळत नाही. या प्रकाराबाबत ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या, परंतु कुणीही कारवाई करण्याची तसदी घेतली नाही. यावर उपाय म्हणून नागरिकांना शेतातून डोक्यावर किंवा बैलगाडीने पाणी आणावे लागते. (प्रतिनिधी)