नव्या रेल्वेगाड्या हव्यात
By Admin | Updated: July 5, 2014 02:12 IST2014-07-05T02:12:46+5:302014-07-05T02:12:46+5:30
रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर होण्यास अवघा चार दिवसांचा कालावधी उरला आहे.

नव्या रेल्वेगाड्या हव्यात
नागपूर : रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर होण्यास अवघा चार दिवसांचा कालावधी उरला आहे. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाबाबत नागपूरकर आणि वैदर्भीयांच्या अनेक अपेक्षा असतात. परंतु प्रत्येक वेळी त्यांचा अपेक्षांचा भंग होतो. त्यामुळे आगामी रेल्वे अर्थसंकल्पात तरी नागपूरला नव्या गाड्या आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात दरवर्षी विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येतो. विदर्भात अनेक प्रकल्पांची घोषणा तर अर्थसंकल्पात होते. परंतु जाहीर केलेले प्रकल्प निधीअभावी वर्षानुवर्षे रखडत ठेवण्यात येतात. मागील अनेक वर्षांपासून नागपूर-दिल्ली दुरांतो एक्स्प्रेसची मागणी होत आहे. नागपुरातून अनेक राजकीय कार्यकर्ते, व्यापारी आपल्या कामानिमित्त दिल्लीला जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी थेट गाडी सुरू करण्याची मागणी आहे. परंतु अद्याप या मागणीची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली नाही.
याशिवाय नागपूरवरून पुणे आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. या मार्गावरील रेल्वेगाड्या नेहमीच हाऊसफुल्ल असल्याची स्थिती असते. त्यामुळे या मार्गावर आणखी रेल्वेगाड्या सुरू करून नागपूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे गरीबरथ डेली करण्याची गरज आहे. याशिवाय नागपूर शहरातून तीर्थस्थळांना जोडणाऱ्या थेट रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे. याशिवाय नागपूर-लखनौ, नागपूर-मद्रास, नागपूर-हावडा येथेही थेट रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे. नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असून नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे नागपूर शहरातून सर्व दिशांना जाणाऱ्या थेट रेल्वेगाड्या सुरू करणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)