महिलांचा सन्मान वाढविणारी नवी परंपरा
By Admin | Updated: September 21, 2015 02:52 IST2015-09-21T02:52:16+5:302015-09-21T02:52:16+5:30
लोकमतने महिलांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने एका खास उपक्रमाला प्रारंभ केला आहे.

महिलांचा सन्मान वाढविणारी नवी परंपरा
नागपूर : लोकमतने महिलांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने एका खास उपक्रमाला प्रारंभ केला आहे. या अंतर्गत ‘तिचा गणपती’ हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. लोकमत सखी मंचच्या संयोजनात आणि अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने व्यंकटेशनगर, नंदनवन ब्लॉक, एच. घरकुल येथे हा गणेशोत्सव महिलांतर्फे जोशात आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाच्या चतुर्थ दिनी रविवारी प्रमुख अतिथी प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त रजनी झोड आणि सेंट झेव्हियर्स स्कूल, हिंगणाच्या प्राचार्य पल्लवी दाढे यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. याप्रसंगी मंडळाच्या सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होत्या. लोकमतने महिलांना सन्मान देण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम अनोखा असल्याचे मत अतिथींनी व्यक्त केले. यामुळे एक नवी परंपरा सुरू झाली, असे त्या म्हणाल्या.
‘तिचा गणपती’ या उत्सवात संपूर्ण व्यवस्थापन महिलांचेच आहे. दररोज महिलांच्याच हस्ते येथे आरती करण्यात येते.
गणेशोत्सवा दरम्यान येथे रोज सायंकाळी ७ वाजता आरती आणि विविध स्पर्धांचे आयोजन महिलांतर्फेच करण्यात आले आहे. लोकमतच्या सर्व महिला वाचकांनी तिचा गणपती या महिलांना सन्मान देणाऱ्या उत्सवात अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे. लोकमत सखी मंच महिलांचा मंच आहे. या मंचने आपल्या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचेच कार्य केले नाही तर त्यांना आत्मसन्मान लाभावा यासाठीही अनेक उपक्रम राबविले आहेत. (प्रतिनिधी)