बाबासाहेबांनी विकसित केले इतिहासातील नवीन सिद्धांत
By Admin | Updated: March 23, 2015 02:37 IST2015-03-23T02:37:47+5:302015-03-23T02:37:47+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान इतिहासकार सुद्धा होते. त्यांनी केवळ इतिहासाचे लेखनच केले नाही,

बाबासाहेबांनी विकसित केले इतिहासातील नवीन सिद्धांत
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान इतिहासकार सुद्धा होते. त्यांनी केवळ इतिहासाचे लेखनच केले नाही, तर इतिहासाचे संशोधन करीत असताना त्यांनी अनेक नवीन सिद्धांतही मांडले आणि ते विकसित केले आहेत. त्यांच्या सिद्धांताला इतिहासाच्या क्षेत्रात आज जगभरात मान्यता मिळाली असून इतिहासाचा अभ्यास करीत असताना या सिद्धांतांचा विचार करावा लागत आहे, असे प्रतिपादन इतिहासकार व हरियाणा कुरुक्षेत्र विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रो. डॉ. एस.के. चहल यांनी शुक्रवारी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दीक्षांत सभागृहात आयोजित दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचा शुक्रवारी सायंकाळी समारोप करण्यात आला. ‘इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर डॉ. चहल मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते. व्यासपीठावर डॉ. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे होते.
डॉ. चहल म्हणाले, भारताचा इतिहास लिहिला गेला तेव्हा त्यात दलित व महिलांना कुठलेच स्थान मिळाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या प्राचिन इतिहासावर बरेच संशोधन केले. केवळ संशोधनच केले नाही, तर इतिहासाचे लेखन करताना नवीन सिद्धांत विकसित केले. त्यांच्या इतिहास लेखणीचा नायक हा सर्वसामान्य व्यक्ती होता. दलित होते. शोषित होते. महिला होत्या. ‘शुद्र पूर्वी कोण होते’, ‘रिडल्स आॅफ हिंदुईझम’, ‘द अनटचेबल’ यासारख्या अनेक ऐतिहासिक संशोधनपर ग्रंथाद्वारे त्यांनी प्राचिन भारतातील जाती व्यवस्थेवर प्रकाश टाकला. क्रांती अणि प्रतिक्रांतीसारखा ग्रंथ लिहून त्यांनी इतिहासातील नवे सिद्धांत निर्माण केले. भारताच्या फाळणीवर प्रकाश टाकणारा थॉट्स आॅन पाकिस्तानसारखा ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिला. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्रासह भारतीय राजकारण, संविधानाची निर्मिती यासोबतच भारताच्या इतिहास संशोधनातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अमूल्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. मुरलीधर चांदेकर यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रमेश शंभरकर यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)