नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात ४० नव्या कोऱ्या लालपरींची भर पडली आहे. नागपूर, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याला या बसेस मिळाल्या आहेत.
अलीकडे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागत असल्याने, लग्न समारंभ असल्याने प्रवाशांच्या गर्दीत आणखी भर पडणार आहे. त्या तुलनेत राज्यातील अनेक एसटी डेपोंत बसेसची संख्या कमी आहे. ठिकठिकाणी प्रवासी जास्त आणि एसटी बसेस कमी असल्याने खटारा झालेल्या एसटीच्या बसेस चालवून प्रवाशांची वाहतूक होत आहे. त्यामुळे एकीकडे ही बस कधी बंद पडेल आणि प्रवाशांना त्रास होईल, त्याचा नेम नाही. दुसरीकडे या बसेसचा अपघात होणे, आगी लागणे आदी प्रकाराचाही धोका असल्याने बसमध्ये प्रवास करणाऱ्यांचा जीव टांगणीला असतो. त्याचप्रमाणे या बसेसचे संचालन करणाऱ्या एसटीच्या चालक, वाहकांसोबत अधिकाऱ्यांचीही सारखी धाकधूक होत असते. त्यामुळे राज्यातील बहुतांश विभाग व्यवस्थापकांकडून नव्या बसेसची मागणी एसटी महामंडळाकडे नोंदविण्यात आली आहे. एसटीच्या ताफ्यात नवीन पाच हजार बसेस सहभागी करण्याची घोषणा करणाऱ्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षांकडून घोषणेेची पूर्तता कधी होते, ते स्पष्ट नाही. मात्र, ५० बसेस मागितल्या असतील तर पाच-दहा नवीन बसेस देऊन प्रत्येकाचे समाधान करण्याचे धोरण एसटी महामंडळाच्या शीर्षस्थांनी राबविले आहे. या पार्श्वभूमीवर, या आठवड्यात विदर्भातील नागपूर जिल्ह्याला १०, बुलढाणा २० आणि वाशिम जिल्ह्याला १० नवीन बसेस देण्यात आल्या आहेत. एकीकडे इलेक्ट्रिक बसेसची चलती असताना एसटी महामंडळाकडे चार्जिंग स्टेशनची समस्या असल्याने तूर्त इलेक्ट्रिक बसेसला बाजूला ठेवण्यात आले आहे. सध्या पुरवण्यात आलेल्या सर्व बसेस डिझेलवर चालणाऱ्या आहेत.
नव्या बसेस आरामदायकजुन्या बसेसच्या तुलनेत नवीन आलेल्या बसेस आरामदायक आहेत. अधिकाऱ्यांच्या मते या बसेसची सीट ॲटजस्टेबल आहे. याशिवाय अनेक सुविधा या बसेसमध्ये आहेत. शुक्रवार, २८ फेब्रुवारीपासून नागपूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेत नवीन बसेस सुरू करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी दिली आहे. या बसेसमुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करून त्यांना अधिक चांगली सेवा देणे सोयीचे होणार असल्याचा विश्वास गभणे यांनी व्यक्त केला आहे.