नागपूर : मंगळवारी, २५ मेपासून नवतपा अर्थात ‘वैशाख वणवा’ सुरू होत आहे. नवतपा जेवढा अधिक तापणार, तेवढाच पाऊस अधिक पडतो, अशी धारणा आहे. मात्र यंदाचा नवतपा ढगांच्या गर्दीतून येणार आहे. हा नवतपा ३ जूनपर्यंत चालणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० मेपर्यंत नागपुरातील अवकाश ढगाळलेले राहील. २६ आणि २७ तारखेला उन-सावलीचा खेळ चालेल, तर, २७, २८ मे रोजी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस येण्याची शक्यता आहे. २९ आणि ३० मे रोजी काही ठिकाणी विदर्भात पाऊन येऊ शकतो. तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशावर राहील. साधारणत: नवपताच्या काळात पारा जवळपास ४४ अंशापुढे असतो, असा अनुभव आहे.
बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेले चक्रीवादळ आता पुढे सरकत आहे. याचा परिणाम मध्य भारतावर होण्याची दाट शक्यता आहे. कारण, बंगालच्या खाडीत कोणतीही हालचाल झाली, तर त्याचा परिणाम विदर्भातील वातावरणावर दोन दिवसांनी होतो. सध्या अरबी समुद्र आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती क्षेत्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम जाणवत आहे. यामुळेच, नागपूरसह लगतच्या जिल्ह्यात ढग दाटलेले दिसत आहेत. ढग आणि ऊन यामुळे उष्णता वाढलेली जाणवत आहे.
...
उष्णतामान खालावले
नागपुरात सोमवारी सरासरी किमान तापमान १.४ अंशावरून वाढून ४१.३ झाले होते. रात्रीचे तापमान ०.८ अंश सेल्सिअसने घटून २६.६ वर आले होते. चंद्रपूर ४२.६ अंश सेल्सिअसवर सर्वाधिक तापलेले होते. ब्रम्हपुरी ४२.५, अकोला ४२.२, वर्धा येथे ४२ सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. दरवर्षी मेमधील या पंधरवड्यात विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा ४६ ते ४७ वर असतो. यंदा मात्र तो बराच मागे आहे.