युवकांना मिळाली नवी दिशा
By Admin | Updated: February 3, 2015 01:00 IST2015-02-03T01:00:16+5:302015-02-03T01:00:16+5:30
विदर्भात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच युवकांना उद्यमशीलतेकडे नेण्यासाठी कौशल्य आधारित विविध चर्चासत्र, विविध उद्योगांमध्ये यशोशिखरावर गाठलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या

युवकांना मिळाली नवी दिशा
उत्स्फूर्त सहभाग : २५ हजारावर तरुणांनी केली नोंदणी
नागपूर : विदर्भात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच युवकांना उद्यमशीलतेकडे नेण्यासाठी कौशल्य आधारित विविध चर्चासत्र, विविध उद्योगांमध्ये यशोशिखरावर गाठलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनातून तसेच शासकीय व विविध संस्थांनी लावलेल्या स्टॉल्सच्या माध्यमातून नव्या संधी युवकांसाठी उपलब्ध करून देणाऱ्या ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’मधून युवकांना उद्यमशीलतेची नवी वाट मिळाली.
विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनच्या वतीने मानकापूर येथील स्पोर्ट्स स्टेडियम परिसरात आयोजित ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चा सोमवारी समारोप करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या समिटमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांसह छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातूनही तरुण आले होते. २५ हजारावर तरुणांनी प्रत्यक्ष नोंदणी करून घेतली. या समिटमध्ये विविध विषयांवर एकूण २० चर्चासत्रे झाली. यात ५० च्यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभही तरुणांनी घेतला. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आ. अनिल सोले यांच्यासह विजय फडणवीस, नवनीतसिंग तुली, संदीप जाधव, जयंत पाठक, विकास बुंदे, प्रशांत कांबळे, शैलेश ढोबळे, सतीश वडे, जयहरी सिंग ठाकूर, रूपा राय, वर्षा ठाकरे, अॅड. सोनल राऊत, मंजूषा किचनबरे, बबली मेश्राम, दिलीप गौर, चेतन बंदिरगे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
आता नोकरी नाही उद्योग उभारू
आम्ही केवळ नोकरी मिळविण्यासाठी शिकलो पाहिजे, असे आम्हाला आजवर वाटत होते. एवढे शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही तर काय होईल, हीच चिंता लागली होती. पण आता नोकरीच्या मागे लागायचे नाही. स्वत:च्या पायावर उभे राहायचे. स्वत:चा उद्योग उभारायचा आणि आपल्यासारख्याच शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा, ही प्रेरणा युथ एम्पॉवरमेंट समिटमधून आम्हाला मिळाली, असा निर्धार शेकडो तरुणांनी व्यक्त केला.