मिहानमध्ये नवीन कंपन्यांकडून विचारणा
By Admin | Updated: November 25, 2014 00:54 IST2014-11-25T00:54:31+5:302014-11-25T00:54:31+5:30
मिहानमधील उद्योगांना स्वस्त दरात वीज मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ नोव्हेंबरला केली होती. परिणामी २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून वीज पुरवठा सुरू झाला.

मिहानमध्ये नवीन कंपन्यांकडून विचारणा
स्वस्त विजेचा परिणाम : फूड पार्कची योजना
नागपूर : मिहानमधील उद्योगांना स्वस्त दरात वीज मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ नोव्हेंबरला केली होती. परिणामी २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून वीज पुरवठा सुरू झाला. एमएडीसीने दिलेल्या माहितीनुसार विजेचे प्रति युनिट दर ४.३९ रुपये असल्याने देश-विदेशातील कंपन्यांकडून मिहानमध्ये उद्योग उभारणीसाठी विचारणा होऊ लागली आहे.
तीन हजार एकर जागा रिक्त
मुख्यमंत्री नागपूरचे असल्याने मिहानमध्ये भविष्य आहे, असे उद्योजकांचे मत आहे. सध्या तीन हजार एकर जागा रिक्त आहे. उद्योजकांना आधुनिक उद्योग सुरू करण्याची संधी आहे. ज्यांनी जागा विकत घेतली आणि अद्याप उद्योग सुरू न केलेल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. पण ज्यांना उद्योग सुरूच करायचा नाही, अशांकडून जागा परत घेण्याच्या हालचालीही शासनाने सुरू केल्या आहेत. या जागा नवीन कंपन्यांना देण्याची तयारी एमएडीसीने चालविली आहे. एमएडीसीच्या मुंबई येथील कार्यालयात चार नवीन कंपन्यांनी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. प्रस्तावित प्रकल्पाला मूर्तरूप येईपर्यंत कंपन्यांची नावे जाहीर करणे योग्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
फेब्रुवारीमध्ये अॅडव्हान्टेज विदर्भ
विदर्भात उद्योगांची नव्याने उभारणी आणि विकासासाठी ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ हा महत्त्वपूर्ण इव्हेंट फेब्रुवारी-२०१५ मध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व औद्योगिक संघटनांना निमंत्रित करण्यात येत आहे.
यात मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनचा महत्त्वपूर्ण सहभाग राहणार आहे. आघाडी सरकारने पूर्वी घेतलेल्या या इव्हेंटचा विदर्भाला फायदा झाला होता. मुख्यमंत्री विदर्भाचेच असल्याने या इव्हेंटला आता आगळेवेगळे महत्त्व राहील. (प्रतिनिधी)
२३ कंपन्यांना वीज पुरवठा
मिहानमध्ये सध्या २३ कंपन्या कार्यरत असून ४ मेगावॅट विजेचा पुरवठा सुरू आहे. पूर्वीपेक्षा विजेचा दर अर्धा आहे. मुळात उत्पादक युनिटसाठी विजेचे दर महत्त्वाचे ठरतात. त्यावर उत्पादनाची गती अवलंबून आहे. स्वस्त विजेमुळे अनेक उद्योग मिहानमध्ये सुरू होतील. छोट्या उद्योगांनाही शासनाने संधी द्यावी. लवकरच फूडपार्कसाठी मिहानमध्ये १५० एकर जागेची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरण्यात येईल. विदर्भातील फूड उत्पादकांना या जागेत उद्योग सुरू करता येईल. मिहानमध्ये विजेचा प्रति युनिट दर ४.३९ रुपये आहे. तसे परिपत्रकही शासनाने काढले आहे.
मनोहर भोजवानी, अध्यक्ष, मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन.