नवीन अजनी रेल्वेस्थानकाचे काम प्रगतीपथावर; प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सोयी-सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 20:27 IST2023-06-16T20:26:57+5:302023-06-16T20:27:27+5:30
Nagpur News उपराजधानीच्या लाैकिकात भर घालणाऱ्या अजनी रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम जोरात सुरू आहे. येथील भू-अन्वेषण आणि तांत्रिक परिक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून आता इतर काम प्रगतीपथावर असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

नवीन अजनी रेल्वेस्थानकाचे काम प्रगतीपथावर; प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सोयी-सुविधा
नागपूर : उपराजधानीच्या लाैकिकात भर घालणाऱ्या अजनी रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम जोरात सुरू आहे. येथील भू-अन्वेषण आणि तांत्रिक परिक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून आता इतर काम प्रगतीपथावर असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
३५९ कोटी, ८२ लाख रुपये खर्चून अजनी रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. स्थानकाच्या दोन्ही बाजुला प्रशस्त ईमारती राहणार असून येथे ४३२० मिटर क्षेत्रफळात 'रुफ प्लाझा' विकसित केला जाणार आहे. ज्यात वेटिंग लाऊंज, कॅफेटेरिया, रिटेल सारख्या अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. या स्थानकावर येण्याचा आणि जाण्याचा मार्ग वेगवेगळा राहणार आहे.
तूर्त येथे स्थानकाच्या पुर्व दिशेला साफसफाई (साईट क्लियरंस)चे काम सुरू आहे. केंद्रीय विद्यालय अजनीच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे १२० वृक्ष लावण्यात आले आहे. या रेल्वेस्थानकाशी मेट्रो स्टेशन, शहर बस व्यवस्थेच्या अन्य साधनांसह मल्टीमॉडल कनेक्टिव्हीटी राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जाण्यायेण्यासाठी अधिक सोयीचे होईल. साैर उर्जा, जल संरक्षण आणि जल संवर्धनाच्या तरतुदीसोबतच अजनी रेल्वेस्थानकाचा विकास 'हरित भवन' च्या रुपात केला जाणार आहे.
२१ लिफ्ट, १७ एस्केलेटर
नवीन रेल्वेस्थानकावर २१ लिफ्ट, १७ एस्केलेटर आणि ६ ट्रॅव्हलेटरची सोय राहणार आहे. येथे दिव्यांगांची विशेष व्यवस्था केली जाणार असून, मल्टीलेवल पार्किंगचीही सुविधा असणार आहे.