प्राण्यांना नाल्याचा धोका!
By Admin | Updated: July 10, 2014 00:53 IST2014-07-10T00:53:30+5:302014-07-10T00:53:30+5:30
महापौर प्रा. अनिल सोले यांनी मंगळवारी सकाळी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन येथील वन्यप्राण्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. दरम्यान, महाराजबाग प्रशासनाने

प्राण्यांना नाल्याचा धोका!
महापौरांनी केली महाराजबागेची पाहणी : प्रशासनाने वाचला समस्यांचा पाढा
नागपूर : महापौर प्रा. अनिल सोले यांनी मंगळवारी सकाळी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन येथील वन्यप्राण्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. दरम्यान, महाराजबाग प्रशासनाने प्राणिसंग्रहालयाशेजारून वाहणाऱ्या नाल्याकडे सोले यांचे लक्ष वेधून त्याच्या सफाईची मागणी केली. प्रशासनाच्या मते, पावसापूर्वी नाल्याची सफाई झाली नाही तर गतवर्षीप्रमाणे यंदाही नाल्यातील पाणी प्राणिसंग्रहालयात शिरण्याची शक्यता आहे. यामुळे प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर म्हणाले, या नाल्याला सुरक्षा भिंत नसल्याने गतवर्षी ३१ जुलै २०१३ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाणी थेट प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या पिंजऱ्यात शिरले होते.
यात दोन हरणांचा मृत्यूही झाला होता. शिवाय काही वन्यप्राण्यांनी भिंत व मचाणीवर चढून आपला जीव वाचविला होता. अन्यथा अनेक वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागला असता.
माहिती सूत्रानुसार, डॉ. बावस्कर यांनी नाल्याच्या सफाईसाठी यापूर्वीच मनपाच्या धंतोली झोनकडे निवेदन सादर केले आहे. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आज महापौर प्रा. सोले यांनी यासंबंधी लवकरच झोन अधिकाऱ्यांशी चर्चा करून, नाल्याची सफाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सोले यांनी प्राणिसंग्रहालयाशेजारच्या एटीपी ट्रीटमेंट प्लान्टचीही पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत धंतोली झोनचे आरोग्य अधिकारी गोरे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, डॉ. पोटदुखे, अभय दीक्षित व विजय फडणवीस उपस्थित होते. (प्रतिनिधी)