कबाड्याचा निष्काळजीपणा भोवला, बापलेकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 23, 2017 18:59 IST2017-06-23T18:59:46+5:302017-06-23T18:59:46+5:30
कबाडीचा व्यवसाय करणा-या एकाचा निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबीयांचे आयुष्यभरासाठी नुकसान करणारा ठरला.

कबाड्याचा निष्काळजीपणा भोवला, बापलेकाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - कबाडीचा व्यवसाय करणा-या एकाचा निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबीयांचे आयुष्यभरासाठी नुकसान करणारा ठरला. या निष्काळजीपणामुळे कबाड्यासह त्याच्या चिमुकल्याचाही जीव गेला तर पत्नी अन् मुलीसह पाच जण जबर जखमी झाले. 16 जून रोजी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली होती.
शेख शकील शेख बशीर (वय ५५) हा कबाडी मोठा ताजबागमधील हिरालाल सोसायटीतील प्यारे पहेलवानच्या चाळीत भाड्याने राहत होता. त्याने कबाडात वाहनाला लावली जाणारी सीएनजी टँक विकत घेतली होती. तिचे आतून पितळ काढत असताना त्याची पत्नी साबिरा रोम हिने स्टोव्ह पेटवला. टाकीत गॅस असल्यामुळे स्टोव्ह पेटवताच भडका उडाला. त्यामुळे शकील, त्याची पत्नी साबिरा, दोन वर्षांचा रशीद आणि पाच वर्षांची अलफिया तसेच त्यांना वाचवायला धावलेले शेख आबिद (वय २७), शेख आसिफ आणि शाबिर शेख शकील शेख हे सर्व जळून गंभीर जखमी झाले.
त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २० जून रोजी रात्री ८.४० वाजता चिमुकला रशिद तर २१ जूनला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शकीलचा मृत्यू झाला. उर्वरित चार जण गंभीर जखमी आहे. निष्काळजीपणामुळे झालेल्या बापलेकाच्या मृत्यूमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी
शेख शकीलची आर्थिक स्थिती फारच वाईट आहे. त्याच्या घरात खाण्यापिण्याच्या वस्तू तर सोडा साधी भांडीपण नाहीत. दिवसभर कबाड जमवून रात्री शकीलच्या घरी चूल पेटत होती. आता तोच गेल्यामुळे त्याच्या परिवारातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वाकोडीकर यांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाची चौकशी केली जात आहे.