शहरातील धोकादायक वाहतुकीकडे दुर्लक्ष; पोलिसांकडून बघ्याची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2023 10:54 PM2023-07-13T22:54:52+5:302023-07-13T22:55:21+5:30

Nagpur News चाैकाचाैकांतील सिग्नलवरून अवजड लोखंड धोकादायक स्थितीत वाहतुकीच्या लहान गाड्यांमधून नेले जात असले तरी पोलिस त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे भयंकर दुर्घटना होण्याचा धोका आहे.

Neglect of dangerous traffic in the city; The role of the police | शहरातील धोकादायक वाहतुकीकडे दुर्लक्ष; पोलिसांकडून बघ्याची भूमिका

शहरातील धोकादायक वाहतुकीकडे दुर्लक्ष; पोलिसांकडून बघ्याची भूमिका

googlenewsNext

नरेश डोंगरे

नागपूर : शहरात वर्दळीच्या मार्गावर भरदिवसा धोक्याची वाहतूक सुरू आहे. चाैकाचाैकांतील सिग्नलवरून अवजड लोखंड धोकादायक स्थितीत वाहतुकीच्या लहान गाड्यांमधून नेले जात असले तरी पोलिस त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे भयंकर दुर्घटना होण्याचा धोका आहे.

मालवाहतुकीसाठी वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून विशिष्ट अटी, नियम घालून दिले असतात. रेती, गिट्टी, कांच, टिनाचे पत्रे, लोखंडी सळया, अवजड लोखंडी पोल वाहून नेण्यासाठी मोठी आणि सुरक्षित वाहनेच वापरावीत, असा दंडक असताना लहान-सहान वाहनांमधून अवजड लोखंडी पोल, लोंबकळलेल्या अवस्थेत सळया वाहून नेल्या जात आहेत. विशेष म्हणजे, छोट्याशा (मिनी डोअर) मालवाहूच्या डाल्यावर पुढे आणि मागे काढलेले १२ ते १५ फुटांचे लोखंडी पोल वाहून नेले जाते. या प्रचंड वजनाच्या पोलला मागे आणि मधल्या भागात प्लास्टिकचे पोते गुंडाळून त्याआधारे नायलॉन दोर बांधला जातो आणि त्या अवस्थेत केवळ दोराच्या साह्याने या पोलची वाहतूक शहरातून केली जाते.

शहरात सध्या सर्वत्र रस्त्याचे काम सुरू असून जागोजागी खड्डे-नाल्या आहेत. त्यातून हा अवजड माल वाहून नेणारा मिनिडोअर उसळल्यास बॅलेन्स बिघडून अवजड लोखंडी पोलच्या टोकावर बांधलेला दोर तुटू शकतो आणि वाहनातील लोखंडी पोल बाजूच्या, तसेच मागच्या बाजूने येणाऱ्या वाहनांवर आदळून मोठा अपघात होऊ शकतो. वाहतुकीच्या या भयावह प्रकाराला जागच्या जागी रोखण्याची जबाबदारी वाहतूक शाखेच्या पोलिसांची आहे. मात्र, ते याकडे लक्ष का देत नाही, हा शंका वाढविणारा प्रश्न आहे.

वरिष्ठांकडून दखल घेण्याची गरज

नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून, ऑटो, ई-रिक्षा, छोट्या व्हॅन, स्कूल बस, सायकल रिक्षा, तसेच आपापल्या पालकांच्या दुचाकीवर बसून शाळेत जा-ये करणारे विद्यार्थी सर्वत्र दिसून येतात. शहरातील सर्वच रस्त्यांवर सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत वाहनचालकांची वर्दळ दिसते. अशात या अवजड लोखंडी पोल वाहून नेणाऱ्या मिनिडोअरचा अपघात झाल्यास भयावह दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन अशी धोक्याची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आहे.

Web Title: Neglect of dangerous traffic in the city; The role of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.