‘एमएडीसी’च्या नोटिशीला नऊ कंपन्यांचे नकारात्मक उत्तर

By Admin | Updated: April 21, 2017 03:04 IST2017-04-21T03:04:53+5:302017-04-21T03:04:53+5:30

‘मिहान-सेझ’मध्ये जमीन वाटप होऊनदेखील अनेक कंपन्यांनी काम सुरू केले नसल्याचे चित्र आहे.

Negative answer to nine companies' MADC notice | ‘एमएडीसी’च्या नोटिशीला नऊ कंपन्यांचे नकारात्मक उत्तर

‘एमएडीसी’च्या नोटिशीला नऊ कंपन्यांचे नकारात्मक उत्तर

‘मिहान-सेझ’मध्ये मिळाली होती जमीन : या कंपन्यांचे काय होणार ?
नागपूर : ‘मिहान-सेझ’मध्ये जमीन वाटप होऊनदेखील अनेक कंपन्यांनी काम सुरू केले नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात ‘एमएडीसी’तर्फे ( महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेन्ट कंपनी) २३ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. यापैकी नऊ कंपन्यांकडून नकारात्मक उत्तर देण्यात आले आहे. या कंपन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ‘एमएडीसी’कडे विचारणा केली होती. ‘मिहान-सेझ’मध्ये किती कंपन्यांनी काम सुरू केले आहे, ज्यांना जागेचे वाटप झाले आहे मात्र काम सुरू झालेले नाही अशा कंपन्यांवर काय कारवाई झाली तसेच ‘एमएडीसी’मध्ये किती रिक्त जागा आहेत, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. ‘एमएडीसी’कडून जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार ‘मिहान-सेझ’मध्ये ६६ कंपन्यांना जमीन देण्यात आली. यातील ३६ कंपन्यांनी कुठलेही काम सुरू केले नाही.
त्यामुळे ‘एमएडीसी’तर्फे २३ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. यापैकी १९ कंपन्यांनी उत्तरे दिली.
यातील १० ठिकाणांहून सकारात्मक उत्तर आले. मात्र नऊ कंपन्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया पाठविली आहे. नजीकच्या भविष्यात या कंपन्या ‘मिहान-सेझ’मध्ये येण्यासाठी इच्छुक नाही, असेच दिसून येत आहे.
‘मिहान-सेझ’मध्ये जमीन मिळावी यासाठी आठ कंपन्यांनी नवीन अर्ज केले आहेत. तर एका ‘ट्रस्ट’ला नुकतीच ११.४४ एकर जमीन निविदेद्वारे देण्यात आली, असे ‘एमएडीसी’कडून स्पष्ट करण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Negative answer to nine companies' MADC notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.