नीरीचे ‘नॉईस ट्रॅकर’; ध्वनिप्रदूषण मोजण्यास ‘क्राउड सोर्सिंग’ तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 07:00 AM2020-11-22T07:00:00+5:302020-11-22T07:00:13+5:30

Nagpur News Neeri राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने शहरातील ध्वनिप्रदूषणाचा स्तर मोजण्यासाठी ‘नॉईस ट्रॅकर’ हा मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे आणि यावर्षी त्याद्वारे यशस्वीपणे तपासणीही करण्यात आली आहे.

Neeri’s ‘Noise Tracker’; Crowd sourcing techniques for measuring noise pollution | नीरीचे ‘नॉईस ट्रॅकर’; ध्वनिप्रदूषण मोजण्यास ‘क्राउड सोर्सिंग’ तंत्र

नीरीचे ‘नॉईस ट्रॅकर’; ध्वनिप्रदूषण मोजण्यास ‘क्राउड सोर्सिंग’ तंत्र

Next
ठळक मुद्देजनसहभागातून देशात पहिल्यांदाच अभिनव प्रयोग

हार्दिक रॉय

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने शहरातील ध्वनिप्रदूषणाचा स्तर मोजण्यासाठी ‘नॉईस ट्रॅकर’ हा मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे आणि यावर्षी त्याद्वारे यशस्वीपणे तपासणीही करण्यात आली आहे. मात्र याचे वैशिष्ट्य म्हणजे या अ‍ॅपद्वारे थेट लोकांद्वारे ध्वनिप्रदूषण मोजण्यात येत आहे. नीरीने त्यास ‘क्राऊड सोर्सिंग टेक्निक’ असे नाव दिले आहे. देशात पहिल्यांदाच असा अभिनव प्रयोग झाला असून विविध भागात राहणाऱ्या लोकांकडूनच ध्वनिप्रदूषणाचे आकडे गोळा करण्यात आले आहेत.

नीरीने दिवाळीच्या काळात झालेल्या ध्वनिप्रदूषणाचे आकडे नुकतेच जाहीर केले, ज्यामध्ये गांधीबाग व अयोध्यानगरसह सात भागात प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडल्याचे नमूद केले आहे. तसे यावर्षी ध्वनिप्रदूषण घटल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे थेट लोकांमधून हे आकडे गोळा करण्यात आले आहेत. नीरीच्या नॉईस अ‍ॅन्ड व्हायब्रेशन, अ‍ॅनालिटीकल इन्स्ट्रुमेंट डिव्हीजनचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी सतीश लोखंडे यांनी लोकमतशी बोलताना या तंत्राविषयी माहिती दिली. हे मोबाईल अ‍प्लिकेशन आहे आणि सहज डाऊनलोड करता येते. अशाप्रकारे शहरातील विविध भागात व्हॅलेन्टियर्सकडे अ‍ॅप डाऊनलोड करून दिवाळीच्या काळात ध्वनीचा स्तर ट्रॅक करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका अतिमहत्त्वाची आहे. लोकांमध्ये जागृती करणे हाच या प्रयोगामागचा उद्देश असल्याचे लोखंडे यांनी स्पष्ट केले.

शहरातील अशा ६६ ठिकाणी व्हॅलेन्टियर्स ठेवण्यात आले होते. त्यांच्या मोबाईल अ‍ॅपवर आलेले आकडे गोळा करून अहवाल तयार करण्यात आला. हे सदस्य आनंदी आणि समाधानी असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. आधी त्यांना फारशी जाणीव नव्हती. मात्र आता अहवाल समोर आल्यानंतर त्यांचा उत्साह वाढला असून भविष्यात अशा प्रत्येक प्रयोगासाठी तयार राहण्याची भावना व्यक्त केल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

मात्र अद्यापपर्यंत आपल्या डोक्यावरचा धोका टळला नसल्याचे त्यांनी सांगितले. सामान्यपणे आपण दैनंदिन जीवनात होणाऱ्या सामान्य ध्वनिप्रदूषणाचा सामना करतो. मात्र जेव्हा फटाके फोडतो तेव्हा त्या ज्वलनशील पदार्थाच्या एकदम जवळ असतो आणि त्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास अधिक ठरतो. त्याचा आवाज अगदी कानाजवळ असतो, त्यामुळे धोका अधिक असल्याचे ते म्हणाले. शिवाय फटाक्याच्या धुराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. मागील वर्षीपेक्षा ध्वनिप्रदूषण कमी असले तरी ठरलेल्या आदर्श मर्यादा व सीपीसीबीच्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक असल्याने सतर्क राहण्याची नितांत गरज असल्याचे मत सतीश लोखंडे यांनी व्यक्त केले.

Web Title: Neeri’s ‘Noise Tracker’; Crowd sourcing techniques for measuring noise pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.