नागपूर : अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यानंतर मंत्रीपदाचे आमिष दाखवत आमदारांना जाळ्यात ओढणारा गुजरातमधील नीरजसिंह राठोड याला गुरुवारी नागपुरात आणण्यात आले. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान पहिल्याच दिवशी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्याने सुमारे १६ आमदारांना फोनवरून संपर्क केल्याची बाब स्पष्ट झाली असून त्याच्याविरोधात अगोदरदेखील फसवणूकीचे गुन्हे दाखल होते. तो तिहार तुरुंगात कैददेखील होता व बारावी पास असूनदेखील त्याने आमदारांना गंडविण्याचा ‘प्लॅन’ रचला.
राठोड याने भाजपच्या केवळ सहाच नाही तर १६ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केले होते. यात मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे, तसेच गोवा येथील आमदार प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे आमदार बाशा चँग यांचा समावेश आहे. इतर आमदारांची नावे समोर येऊ शकलेली नाही. पोलिसांनी गुरुवारी त्याला नागपुरात आणल्यावर न्यायालयासमोर उभे केले. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मोबाईलमधून समोर येणार आणखी नावे
पोलिसांकडून त्याच्या मोबाईलचा ‘सीडीआर’ तपासण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो तीनहून अधिक मोबाईल क्रमांक वपरत होता. याशिवाय त्याच्याकडे इतर मोबाईल क्रमांकदेखील होते. तो मोरबी येथे टाईल्सचे काम करायचा. त्याच्या दुकानाच्या बाजूला मोबाईल शॉपी असून तिथून वेगवेगळे नंबर घेऊन तो फसवणुकीसाठी वापरायचा.
दिल्लीत गुन्हे दाखल
चौकशीदरम्यान त्याने आमदारांना फोन लावून पैसे मागितल्याची बाब कबूल केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याचा हा पहिलाच गुन्हा नाही. बारावी नापास असलेल्या या ठकबाजाने दिल्लीतदेखील काही जणांना फसविले होते. त्याच्याविरोधात तेथेदेखील गुन्हे दाखल झाले होते. त्याला काही काळ तिहार तुरुंगातदेखील ठेवण्यात आले होते. तेथून तो १४ जानेवारी रोजी बाहेर निघाला व त्यानंतर त्याने आमदारांना गंडविण्याचा ‘प्लॅन’ रचला.
अटकेअगोदर ‘दिल्ली’वारी कुणाकडे ?
अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत त्याच्या दिल्लीवारीची बाबदेखील समोर आली आहे. चार दिवसांअगोदर त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या चमूला तो आढळला नाही. त्याच दिवशी सकाळी तो अहमदाबादमधून विमानाने दिल्लीला गेला होता आणि दिल्लीमध्ये कोणालातरी भेटून तो अहमदाबादमार्गे मोरबीला परतल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो दिल्लीत नेमका कुणाला भेटायला गेला होता, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.