जीवनदायी योजनेवर शस्त्रक्रियेची गरज
By Admin | Updated: November 8, 2014 02:44 IST2014-11-08T02:44:43+5:302014-11-08T02:44:43+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाच हजार रुपये भरल्याशिवाय अॅन्जिओग्राफी होतच नाही.

जीवनदायी योजनेवर शस्त्रक्रियेची गरज
सुमेध वाघमारे नागपूर
शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाच हजार रुपये भरल्याशिवाय अॅन्जिओग्राफी होतच नाही. हा नियम बीपीएलसह सर्वच रुग्णांसाठी आहे. विशेष म्हणजे, राज्यातील गोरगरीब
रुग्णांना दर्जेदार उपचार देण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत’ या चाचणीचा समावेश असतानाही लाभार्थ्यांना पैसे मोजावे लागत आहे. परिणामी अनेक रुग्ण पैशांअभावी अॅन्जिओग्राफीपासून दूर जात असून धोकादायक जीवन जगत आहे.
पूर्वीसारखा हृदयाचा आजार आज श्रीमंतांचा राहिला नाही. तो सामान्य कामगार, गरिबांच्या घरातही दिसू लागला अहे. या आजाराच्या रुग्णाला इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली तर मोठे संकट कोसळल्याप्रमाणे त्या घराची स्थिती होते आणि प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील त्यावरील उपचाराचे जास्त मोठे संकट असल्यासारखे वाटते. खाजगी इस्पितळातील लूट आणि शासकीय इस्पितळात नेल्यास पैशासोबतच रु ग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत आज गरीब वर्ग सापडला आहे. विशेष म्हणजे, अशा रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनाही कुचकामी ठरत आहे.
रुग्णासह त्याचे कुटुंब आजारपणातील असुरक्षितता व मानिसक तणावातून जात आहे.
संरक्षण असतानाही शुल्क भरण्याची अट
रुग्णालयांमध्ये जीवनरक्षक उपकरणांची महत्त्वाची भूमिका असते, मात्र सुपर स्पेशालिटी आणि खासगी रुग्णालयांमध्ये काही वेगळचे चित्र आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ‘अॅन्जिओग्राफी’चा समावेश आहे. त्यानुसार लाभार्थ्यांची ही चाचणी नि:शुल्क व्हावी, असा नियम आहे. परंतु सुपर स्पेशालिटीसह योजनेतील सर्व खासगी इस्पितळांमध्ये जोपर्यंत शुल्क भरले जात नाही, तोपर्यंत चाचणीच केली जात नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांकडे याच्या तक्रारी आहेत, परंतु अद्यापही उपाययोजना नसल्याने गरीब रुग्ण रडवेला झाला आहे. (प्रतिनिधी)