हवे सुरक्षा कवच
By Admin | Updated: November 2, 2014 00:57 IST2014-11-02T00:57:44+5:302014-11-02T00:57:44+5:30
उत्पादकता आणि सुरक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . औद्योगिक क्षेत्रात सुरक्षाचक्र हे २४ तास आणि ३६५ दिवस कार्यरत असणे आवश्यक आहे. सुरक्षा संस्कृती उदयास येण्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे.

हवे सुरक्षा कवच
कारखान्यात होणाऱ्या दुर्घटनांवर नियंत्रण आवश्यक
नागपूर : उत्पादकता आणि सुरक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . औद्योगिक क्षेत्रात सुरक्षाचक्र हे २४ तास आणि ३६५ दिवस कार्यरत असणे आवश्यक आहे. सुरक्षा संस्कृती उदयास येण्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे. या सुरक्षेचा केंद्रबिंदू कामगार असल्याने प्रत्येक कारखान्याच्या व्यवस्थापनाने सुरक्षेवर विशेष भर देण्याची आवश्यकता असल्याची बाब पुढे आली आहे.
महाराष्ट्र राज्य हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात अधिक प्रगत राज्य आहे. त्यामध्ये ३७०५९ नोंदणीकृत कारखाने असून त्यातील कामगारांची संख्या सुमारे १२ लाख इतकी आहे. कापड कारखाने, रासायनिक, अभियांत्रिकी, औषध, खत कारखाने, जंतुनाशक, पेट्रोकेमिकल्स, सिमेंट, कागद अशा मोठ्या उद्योग समूहाचाही समावेश आहे. या कारखान्यात उत्पादनात अनेक प्रकारच्या गुंतागुंतीच्या प्रकिया चालतात. ज्या लहान कारखान्यात धोकादायक, विषारी ज्वालाग्रही रसायने वापरली जातात, त्या लहान उद्योगांना शासनाने अधिसूचना काढून कारखाने अधिनियम लागू केले आहेत. अशा सर्व प्रकारच्या कारखान्यातील कामगारांच्या प्रामुख्याने सुरक्षितता व आरोग्यविषयी अंमलबजावणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयावर सोपविण्यात आली आहे.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, हे कामगार विभागाच्या अधिपत्याखाली असून संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य महाराष्ट्र राज्य हे विभागप्रमुख आहेत. या विभागाचे प्रमुख कार्यालय मुंबई येथे असून अपर संचालक तीन आहेत व ते मुंबई, पुणे व नागपूर येथे आहेत.
या संचालनालयाचे कामकाज मुख्यत: तांत्रिक स्वरूपाचे असून कामगार व इतर कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. (प्रतिनिधी)
सुरक्षेवर नेहमीच भर
कळमेश्वर औद्योगिक परिसरात ११० प्लॉट असून ५० ते ५५ कारखाने सुरू आहेत. कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे सुरक्षेवर भर देण्यात येतो. बसेसवर बॅनर आणि रॅली, ड्रामा आणि फायर ब्रिगेड वाहनांद्वारे सुरक्षा जागरूकता आणण्यावर प्रयत्न केला जातो. कारखान्यांमध्ये अग्निशमन उपकरणांची पाहणी करण्यात येते. याशिवाय प्रदूषणरहित वातावरणावर विशेष भर असतो. याशिवाय शाळांमध्ये संबंधित विषयावर स्पर्धा, अपघात टाळण्यासाठी वळणांवर रेडियम, वाहतूक पोलिसांद्वारे रस्ते सुरक्षेवर शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेण्यात येतात. कळमेश्वर औद्योगिक परिसरातील छोट्या व मोठ्या कारखान्यांतील कामगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गृहिणींसाठी गॅस सेफ्टी आणि प्रथमोपचारावर कार्यक्रम, एमआयडीसी परिसरात हाईट सेफ्टीचे थेट प्रात्यक्षिक, सुरक्षा सप्ताहात विविध उपक्रम आणि नगर परिषदेचा सहभाग आदींवर भर देण्यात येतो. रसायने आणि पाण्यावर कारखान्यात प्रक्रिया करून सोडले जाते. आगीवर नियंत्रणासाठी कारखान्यांमध्ये उपकरणे बसविली आहेत, शिवाय नगर परिषदेची मदत घेण्यात येते. आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळविण्यासाठी असोसिएशनने व्यवस्थापनाला अत्याधुनिक उपकरणे बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचे पालन व्यवस्थापन करते.
रियाज कमाल, उपाध्यक्ष,
कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशन.
सुरक्षेची उपकरणे अत्याधुनिक
उद्योग म्हटले की लहान मोठे अपघात घडतच असतात, पण बुटीबोरी इंडस्ट्रीज परिसरात सुरक्षेवर विशेष भर दिला जातो. त्यासाठी असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी झटत असतात. कारखान्यांमधील कामगारांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. याशिवाय प्रत्येक कारखान्याचे व्यवस्थापन कामगारांच्या व्यक्तीश: सुरक्षेवर विशेष भर देते. यासाठी कारखान्यांमध्ये अत्याधुनिक उपकरणे बसविली आहे. उद्योगांमध्ये कार्यरत असलेले मनुष्यबळ कोणत्याही संकटाच्या परिस्थितीत कामाला येऊ शकेल, असे उपक्रम व्यवस्थापनातर्फे राबविले जातात. त्यासाठी नियमित पद्धतीने चाचण्या आणि उपकरणांची देखभाल केली जाते. हायटेक कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची चमूसुद्धा आपले काम चोख बजावते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित अधिकारी दक्ष असावे, या उद्देशाने असोसिएशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रीलचे आयोजन नेहमीच केले जाते. या उपक्रमात फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि कामगार विभागाला सहभागी केले जाते. त्यात आढळून आलेल्या त्रुटींची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिली जाते आणि त्याच्या पूर्ततेसाठी असोसिएशन पुढाकार घेते. सुरक्षेसाठी मोठ्या उद्योगाचे वेगळे विंग आहे. कारखान्यातील रसायने आणि पाणी वाहून नेण्यासाठी ’कॉमन एफिशिएन्ट ट्रीटमेंट प्लॅन्ट’ (सीईटीपी) आहे.
प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष,
बुटीबोरी इंडस्ट्रीयल असोसिएशन.